मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या दूर व मुक्त अध्ययन (आयडॉल) संस्थेच्या अभ्यासक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मतारखेत आणि नावात मोठा गोंधळ घातला आहे. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यानंतर आयडॉलच्या या पुस्तकात झालेली चूक ही तातडीने दुरूस्त करण्यासाठी आम्ही कार्यवाही सुरू केली आहे. ती चूक अनावधानाने झाली असल्याचे आयडॉलचे उपकुलसचिव डॉ. विनोद मळाळे यांनी सांगितले आहे.
महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 या तारखेला झाला असताना आयडॉलच्या पदव्युत्तरच्या एका अभ्यासक्रमात 2 ऑक्टोबर 1969 असे नमूद करण्यात आले आहे. त्यासोबत त्यांचे संपूर्ण नाव हे मोहनदास करमचंद गांधी असे असताना आयडॉलने मात्र मोहन करमचंद गांधी, असे अर्धवट नाव छापल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.
आयडॉलच्या एम.ए. भाग-१ च्या इतिहास विषयाच्या अध्ययनच्या एका पुस्तकात महात्मा गांधी यांच्याविषयी ही चूक झाली आहे. ती उशिरा लक्षात आल्याने त्यासाठीच्या सर्व पुस्तकांमध्ये लवकरच बदल करण्यात येणार असल्याचे, आयडॉलकडून सांगण्यात आले आहे.