मुंबई : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे यजमान पद भारताकडे आहे. या विश्वचषक स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून देशातील बारा ठिकाणी 48 सामने खेळण्यात येणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आज मुंबईत ही माहिती दिली.
देशभरात सामन्यांचे आयोजन : यावेळी बोलताना जय शहा म्हणाले की, देशातल्या सर्व क्रिकेट रसिकांना विश्वचषकाचा आनंद घेता यावा यासाठी देशभरात विविध ठिकाणी सामने आयोजित करण्यात आले आहेत. अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. यावेळी माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याच्याशी दिलखुलास चर्चा करण्यात आली. आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना पाहायला आवडेल. हा सामना म्हणजे क्रिकेट रसिकांना पर्वणी असते, असे वीरेंद्र सेहवाग याने म्हटले. तो मंगळवारी मुंबईत बोलत होता.
भारत पाकिस्तान सामना महत्त्वाचा : सेहवाग म्हणाला की, सर्व सामन्यांमध्ये भारत पाकिस्तान यांच्यातील सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. या दोन्ही देशांमध्ये होणारा प्रत्येक सामना उत्कंठावर्धक असतो. प्रत्येक क्रिकेट रसिक त्याची आतुरतेने वाट पाहत असतो. या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत आणि पाकिस्तान हे चार संघ पोहोचतील असा विश्वास वीरेंद्र सेहवाग याने यावेळी व्यक्त केला. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना पाहायला आवडेल असे तो म्हणाला.
विराट आणि रोहित यांच्यावर नजर : वीरेंद्र सेहवाग पुढे बोलताना म्हणाला की, 'विश्वचषकात सर्वाधिक धावा कोण करणार हे आताच सांगणे कठीण आहे. मात्र विराट कोहली आणि रोहित शर्मा हे या विश्वचषकात अधिक धावा जमवतील असे वाटते'. सध्या सर्वच फलंदाज धावा जमवताना पारंपारिक क्रिकेट शॉट न खेळता कसेही फटके मारताना दिसतात. आता अशाच शॉट्सची चलती असून हेच फलंदाज अधिक धावा जमवतील. त्यामुळे हा विश्वचषक रोमांचक होईल असेही वीरेंद्र सेहवाग यावेळी म्हणाला.
हेही वाचा :