मुंबई ICC Cricket World Cup 2023 : भारतात सध्या सुरू असलेली क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा ही अंतिम टप्प्यात आली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) या दोन संघात मुंबईतील वानखेडे स्टेडीयम (Wankhede Stadium) येथे सेमी फायनलचा सामना रंगणार आहे. स्टेडीयमधून प्रत्यक्ष मॅच पाहण्याकरता देश विदेशातील क्रिकेट प्रेमी उत्सुक आहेत. त्यांना बुक माय शो या पोर्टलवर मॅचची तिकिटे उपलब्ध केलेली आहेत. ११ नोव्हेंबरला गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, आकाश कोठारी हा त्याचे राहते घर मालाड येथून १५ नोव्हेंबरच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या सेमी फायनल सामन्याची तिकीटे, त्यांच्या मूळ किंमतीपेक्षा चार ते पाच पटीनं वाढीव किंमतीने क्रिकेटप्रेमींना विकणार आहे. तसंच क्रिकेट वर्ल्ड कप तिकीटांचा काळाबाजार करून क्रिकेट सामन्याच्या आयोजकांची तो फसवणूक करीत आहे. याप्रकरणी त्याला सर जे जे मार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तिकिटांची ब्लॅक विक्री : परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की, वर्ल्ड कप भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या वानखेडे स्टेडियम होणाऱ्या क्रिकेट सामान्याच्या तिकिटांची काळ्या बाजारात विक्री काही जण करत आहेत. या माहितीच्या अनुषंगाने अधिक चौकशी करून आकाश कोठारी (वय ३०) याला सर जे जे मार्ग पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतलं.
अधिकृत ठिकाणाहून तिकिटांची करा खरेदी : पुढे मुंडे यांनी सांगितलं की, आरोपी आकाश २ आणि अडीज हजाराची तिकिटे ३५ ते ४० हजाराच्या दराने विक्री करण्याच्या बेतात होता. यासंदर्भात पुरावे मिळाल्यानंतर आकाशवर सर जे जे मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान ४२० आणि ५११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरु आहे. तरीही सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की, अनाधिकृत ठिकाणाहून किंवा व्यक्तींकडून तिकिटांची खरेदी करू नका. खोटी तिकिटं, बनावट प्रिंट काढलेली तिकिटं, वापरलेली किंवा स्कॅन केलेली तिकिटं देखील दिली जाऊ शकतात. तसा गुन्हा यापूर्वी भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यादरम्यान झालेला आहे. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळं अशी फसवणूक पुन्हा होऊ शकते तरी काळजी घ्या. अधिकृत ठिकाणाहून तिकिटांची अधिकृत दरामध्ये खरेदी करावी, असं आवाहन परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी केलं आहे.
हेही वाचा -