मुंबई - काँग्रेसमध्ये कोणतीही प्रकारची गटबाजी नाही. मात्र, काही गैरसमज आहेत. त्यातूनच संजय निरुपम यांनी काही आरोप केले आहेत. त्यांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सामील होण्यासाठी आपण स्वतः भेटून विनंती करणार असल्याची माहिती आज मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
निरुपम यांनी पक्षावर केलेल्या आरोपांबद्दल गायकवाड यांनी कोणताही प्रतिवाद केला नाही. शिवाय, निरुपम यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपली तक्रार करावी आणि नंतरच निर्णय घ्यावा अशी सुचनाही गायकवाड यांनी केली आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पदाधिकारी मिळून काम करणार आहेत. तसेच, अभिनेत्री उर्मिला मातोंडकरदेखील पक्षाचा प्रचार करणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. "मातोंडकर यांना मी समजावले असून त्या लवकरच प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. दोन दिवसात त्या आपला निर्णय सांगतील" असे गायकवाड म्हणाले.
हेही वाचा - प्रदेश युवक काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस
आरेतील वृक्षतोडीविषयी बोलताना ते म्हणाले, मुंबईची साफ सफाई केली जात नाही, पण एका रात्रीत चारशे झाडे कापली जातात. लोक सरकारवर खूप नाराज आहेत. ती नाराजी मतदानातून लोक दाखवतील, असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला.