मुंबई - मी नुसते बोलत नाही तर जे बोलतो ते करुन दाखवतो. निवडणुकीच्या आधी ५०० फुटांच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करू असे वचन दिले होते. ते आज पूर्ण करत असल्याचे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
मुंबई अग्निशमाक दलाच्या इंटिग्रेटेड कमांड ऍन्ड कंट्रोल सिस्टम, रासायनिक हल्ले आणि आगीवर नियंत्रण करणाऱ्या हॅजमॅट वाहनांचे उदघाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आदित्य ठाकरे उपस्थित होते.
जानेवारीपासून ५०० फूट घरांचा मालमत्ता कर रद्द झाला आहे. मुंबईत ३० ऐवजी ६० लोकांसाठी एक शौचालय आहे. ही संख्या लवकरच कमी करू असेही ठाकरे म्हणाले. नारळ फुटले की लोकांना निवडणुका जवळ आल्या असे वाटते मात्र, आज जे नारळ फुटले ते हॅजमॅट वाहन लोकांच्या उपयोगी येणार आहे. यावेळी २२ हजार ७४४ शौचकूपांच्या बांधकामाचे तसेच मराठी रंगभूमी इतिहास कलादालनाचा शुभारंभही करण्यात आला.