मुंबई - भंडारा येथील रुग्णालयात आग लागून १० लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतही शेकडो रुग्णालये अशी आहेत ज्यांनी अग्निशमन दलाच्या नियमांची अंमलबजावणी केलेली नाही. यामुळे या रुग्णालयांत कधीही आग लागून भंडारासारखी परिस्थिती उद्भवू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, जी रुग्णालये अग्निशमन दलाच्या नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी, ती बंद करण्यासाठी पालिका प्रशासन, आरोग्य विभाग आणि अग्निशमन दल पुढे येत नसल्याचे समोर आले आहे.
बेकायदेशीर रुग्णालये -
भंडारा येथील रुग्णालयाला आग लागून १० लहान बालकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व रुग्णालयांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईमधील रुग्णालयांची माहिती घेतली असता, आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी 2018 मध्ये मुंबई महापालिकेच्या 24 विभागांपैकी एम पूर्व विभागाची माहिती मागवली होती. त्यात मुंबईत एकूण 1 हजार 319 हॉस्पिटल असून त्यापैकी 60 रुग्णालये एम पूर्व विभागात सुरू आहेत. त्यात 36 बेकायदेशीर असून, 24 कायदेशीर आहेत, अशी माहिती देण्यात आली.
हेही वाचा - 'औरंगाबाद नाही संभाजीनगरच..! शिवसेना अजेंड्यावर ठाम'
बहुतांश रुग्णालये आणि प्रसुतीगृहे ही इमारतींमध्ये आहेत. त्यात चेंज ऑफ युजर होत नसल्याने या रुग्णालयांना अग्निशमन दलाकडून एनओसी मिळत नाही. या रुग्णालयांवर कारवाई करावी म्हणून पालिकेकडे पत्रव्यवहार केल्यावर पालिकेने पोलिसांना पत्र दिले. त्यावर पोलिसांनी पालिकेला एफआयआर दाखल करण्यासाठी यावे म्हणून कळविले आहे. मात्र, पालिकेचा आरोग्य विभाग असा एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांकडे गेला नाही. यामुळे रुग्णालयांवर कारवाई झालेली नाही, असे शकील अहमद यांनी सांगितले. असाच प्रकार मुंबईमधील रुग्णालयांबाबत असल्याचे शकील अहमद म्हणाले.
जनजागृती नेहमीच -
दरम्यान याबाबत मुंबई अग्निशमन दल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आम्ही वेळोवेळी अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करतो. सर्व रुग्णालयांना अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेण्यास सांगितले आहे. जे असे प्रमाणपत्र घेत नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाते, अशी माहिती देण्यात आली.
फायर ऑडिटचे आदेश -
तर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता, दिल्लीत घटना घडली तेव्हाच मुंबईतील सर्व रुग्णालयांचे ऑडिटचे आदेश दिले होते. भंडारा येथील घटना दुर्दैवी आहे. मुंबईतील सर्व रुग्णालय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. फायर विभागानेसुद्धा मुंबईत अशी घटना घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सर्व रुग्णालयांची यंत्रणा योग्य ठेवा, असे आदेश दिल्याची माहिती, महापौरांनी दिली.
मुंबईमध्ये या आधी लागलेल्या आगी -
29 ऑक्टोबर 2020 ला मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या दहिसर कांदरपाडा परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या कोविड रुग्णालयात अचानक आग लागली. अतिदक्षता उपचार केंद्रात एका रुग्णाच्या शेजारी असलेल्या वैद्यकीय उपकरणाला अचानक आग लागली. यावेळी घाबरून न जाता आणि प्रसंगावधान राखत तेथे उपस्थित परिचारिकांसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली.
अपेक्स रुग्णालयाला आग, एक मृत्यू -
मुलुंड येथील अपेक्स रुग्णालयात 12 ऑक्टोबर 2020 ला जनरेटरला आग लागली होती. अचानकपणे लागलेल्या या आगीत रुग्णालयातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. हे रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी रुग्णालयात जवळपास 40 रुग्ण उपचार घेत होते. या रुग्णालयातील रुग्णांना अनेक खासगी रुग्णवाहिकांच्या मदतीने इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पांडुरंग कुलकर्णी ( वय 82) या रुग्णाला मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले. मात्र, त्यांचा तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कामगार रुग्णालय आग -
17 डिसेंबर 2018 ला मुंबई अंधेरीतील कामगार रुग्णालयात आग लागून झालेल्या भीषण दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, तर १४६ जण होरपळले होते. जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. दरम्यान, ४७ जणांना रुग्णालयातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले होते.
हेही वाचा - निकष पूर्ण करणारे नसतील, तर त्यांचे परवाने रद्द करू - नवाब मलिक