मुंबई - परळ येथील टाटा रुग्णालयात कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार केले जातात. टाटा रुग्णालयातील १७८ रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. या रुग्णांवर मुंबई महापालिकेच्या वरळी येथील एनएससीआय डोम सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. त्यापैकी १२६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकाही कर्करोगासह कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. हे देशातच नव्हे तर संपूर्ण जगात दुर्मिळ असे उदाहरण आहे, असा दावा पालिकेने केला आहे.
संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. या विषाणूचा सामना करताना विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ती खालावते, त्यांचा मृत्यू होण्याचा धोका अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे अशा रुग्णांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार याची खबरदारी बृहन्मुंबई महानगरपालिका घेत आहे. जगभरात कर्करुग्णांमध्ये कोरोनाची लागण झाल्यास त्यांतील मृत्यूचे प्रमाण हे तब्बल ५० टक्के इतके आहे. विशेषत: पाश्चात्त्य देशांमध्ये हा अनुभव आला आहे. कोरोना संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोरोनाची बाधा झालेल्या कर्करोगग्रस्तांना सर्वसाधारण कोरोना उपचार केंद्रांमध्ये एकत्रित ठेवता येत नाही, त्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागते. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेने वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे विकसित केलेल्या डोम कोरोना केअर केंद्रात कर्करुग्णांसाठी विशेष व्यवस्था केली आहे.
मुंबईतील परळ येथील सुप्रसिद्ध टाटा रुग्णालयातून डोम कोरोना केंद्रामध्ये आलेल्या कोव्हीड बाधित कर्करुग्णांमध्ये अवघ्या २ वर्ष वयाच्या चिमुरड्यापासून ते ७७ वर्ष वयापर्यंतच्या वृद्ध रुग्णांचा समावेश आहे. देशातील जवळपास सर्व भागातून आलेल्या रुग्णांसह एक विदेशी नागरिकही त्यात आहे. दाखल रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे ५० वर्ष वयावरील आहेत. आतापर्यंत एकूण १७८ कोरोनाबाधित कर्करुग्ण डोम कोरोना केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल झाले आहेत. त्यापैकी १२६ जणांना यशस्वी उपचार देऊन, कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर सोडण्यात आले आहे. यामध्ये एका विदेशी नागरिकाचाही समावेश आहे. तर, ५२ जणांवर उपचार सुरू आहेत.
तर लक्षणीय बाब अशी की, यातील एकही रुग्ण सुदैवाने दगावला नसून ही अत्यंत दुर्मिळ बाब ठरली आहे. दरम्यान, कोरोनाबाधित कर्करुग्णांच्या नातेवाईकांचा विचार करता, डोम कोरोना केंद्रामध्ये १० नातेवाईकांवर देखील यशस्वी उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, ४ नातेवाईकांवर सध्या उपचार सुरू आहेत. सोबतच, मागील २० दिवसांत मुंबईमध्ये कोरोनाबाधित एकाही डायलेसीस रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कारण, अशा रुग्णांसाठी महानगरपालिकेने स्वतंत्र केंद्र, स्वतंत्र यंत्रे नेमून दिलेली असून त्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता कर्करुग्णांच्या बाबतीतही विशेष खबरदारी घेतली जात आहे.