मुंबई Shiv Bhojan Thali : कोरोनाकाळात राज्यभरातील गरीब वर्गामध्ये एक वेळच्या जेवणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. रोजगाराचं साधन बंद झाल्यामुळं हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळं राज्य सरकारनं 26 जानेवारी 2020 रोजी शिवभोजन थाळी योजना राज्यात सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शिवभोजन थाळी केंद्राद्वारे केवळ दहा रुपयांमध्ये जनतेला एका वेळचं जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. आजही शहरी, ग्रामीण भागात गरिबांना एका वेळच्या जेवणासाठी अपार मेहनत करावी लागते. त्यामुळं नियमित रोजगार नसलेल्या लोकांसाठी शिवभोजन थाळी योजना वरदान ठरतेय.
काय आहे शिवभोजन थाळी योजना? : शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत शहरी भागात शिवभोजन थाळी केंद्रावरून जेवण वितरित केलं जातं. प्रत्येक केंद्रावर 75 ते 100 थाळ्या वितरित करण्याची मर्यादा देण्यात आली आहे. लाभार्थ्यांकडून केवळ दहा रुपये सरकार घेतं. तसंच उरलेली रक्कम अनुदान म्हणून केंद्र चालकाला दिली जाते. राज्य सरकार केंद्र चालकांना शहरी भागात ही थाळी 50 रुपये, तर ग्रामीण भागात 35 रुपये दरानं दिली जाते. शासकीय अनुदानित खाद्यपदार्थांच्या स्टॉलद्वारे गरिबांना माफक दरात जेवण या योजनेअंतर्गत दिलं जातंय.
काय असते जेवण? : 'या' योजनेअंतर्गत खानावळ, उपाहारगृह, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट यांना शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत थाळ्या वितरित करण्याची परवानगी देण्यात येते. या जेवणामध्ये दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी भात, एक वाटी वरण दिलं जातं. या योजनेअंतर्गत बस स्थानके, शासकीय कार्यालय, शहरातील रुग्णालय, बाजारपेठा, गर्दीच्या ठिकाणी शिवभोजन थाळीची विक्री केली जाते.
राज्य सरकारचे इष्टांक? : राज्यातील 1 हजार 889 शिवभोजन थाळी केंद्रांवरून दररोज सुमारे एक लाख 68 हजार 103 लाभार्थ्यांना शिवभजन थाळी दिली जाते. राज्य सरकारचा दररोजचा इष्टांक एक लाख 99 हजार 610 इतका आहे. नागपूर विभागात सर्वाधिक 150 केंद्राद्वारे दररोज सुमारे 13 हजार 605 लाभार्थी या योजनेचा लाभ घेतात. तर, सर्वात कमी योजनेचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ केंद्राद्वारे 50 लाभार्थी लाभ घेतात. गेल्या अकरा दिवसांमध्ये राज्यातील 889 केंद्राद्वारे एक लाख 99 हजार 610 इस्टांक असताना 18 लाख 87 हजार 595 थाळ्यांचं वितरण करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या उद्दिष्टाच्या कितीतरी पटीनं जास्त थाळ्यांचं वितरण झालं आहे. गेल्या नऊ महिन्यांमध्ये 1 हजार 890 केंद्राद्वारे चार कोटी सदतीस लाख 38 हजार 57 थाळ्यांचं वितरण करण्यात आलं आहे. या योजनेला राज्यभरात अजूनही उदंड प्रतिसाद मिळत असल्यानं अखेरीस अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या कार्यालयाच्या दारावरच शिवभोजन थाळी योजनेतील इष्टांक मर्यादा संपल्याचा फलकच लावला आहे.
इष्टांक वाढवून द्या : यासंदर्भात बोलताना शिवभोजन थाळी केंद्र चालक रवींद्र कांबळे म्हणाले की, राज्य सरकारनं सुरू केलेली योजना अतिशय चांगली आहे. मात्र, पन्नास रुपयात शहरी भागात दर्जेदार जेवण देणं केंद्र चालकांनाही अवघड होत आहे. त्यामुळं राज्य सरकारनं योजनेचे अनुदान वाढवून द्यावेच, त्याशिवाय या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं राज्य सरकारनं गरिबांच्या कल्याणाचा विचार करून इष्टांक वाढवून द्यावेत, दररोजच्या थाळ्यांची संख्या वाढवून द्यावी, अशी मागणी केंद्र चालकांकडून होत आहे.
कोण घेत आहे थाळ्यांचा लाभ? : यासंदर्भात बोलताना शिधापत्रिकाधारक ग्राहक संघटनेचे अध्यक्ष गोरखनाथ आव्हाड म्हणाले की, कोरोनानंतर सरकारनं काही केंद्र चालकांच्या थाळ्यांची संख्या कमी केली आहे. मात्र, गोरगरीब, कष्टकरी वर्गाची आवश्यकता लक्षात घेऊन सरकारनं थाळ्यांची संख्या वाढवायला पाहिजे. या योजनेअंतर्गत कष्टकरी जनता या थाळ्यांचा लाभ घेत आहे.
हेही वाचा -