मुंबई - दक्षिण भारतात ओणम हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहरातील नागरिकांना या सणाबाबत समजावे यासाठी अम्मा चॅरिटेबल असोसिएशन मार्फत सीएसटीएम स्थानकात फुलांपासून भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. १२० किलो फुलांपासून ही रांगोळी तयार करण्यात आली आहे. ही रांगोळी २६/११ हल्ल्यात मुत्युमुखी पडलेल्यांना समर्पित करण्यात आली आहे.
गेल्या ३ वर्षांपासून ओणम सणानिमित्त अम्मा असोसिएशन मार्फत सीएसटीएम स्थानकात फुलांची रांगोळी काढली जाते. यंदा देखील फुलांपासून भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. ही रांगोळी पाहण्यासाठी अनेक चाकरमानी गर्दी करत आहेत. हा सण आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. राजा महाबलीच्या स्वागतात ओणम हा सण साजरा केला जातो. महाबली राजाच्या काळात गुन्हे, जाती भेदभाव असे काहीच नव्हते. अशी सुस्थिती पुन्हा भारतात निर्माण झाली पाहिजे. त्याचबरोबर, सीएसटीएम स्थानकात झालेल्या २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांना ही रांगोळी समर्पित करत आहोत, असे अम्मा चॅरिटेबेल असोसिएशनचे अध्यक्ष जोजो थॉमस यांनी सांगितले आहे.