मुंबई - मुंबईच्या डबेवाल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनाच्या काळात डबघाईला आलेल्या डबेवाल्यांना आता मदतीचा हात मिळाला आहे. हा मदतीचा हात एचएसबीसी या विदेशी बँकेने दिला आहे. बँकेने 15 कोटी रुपयांची मदत मुंबईच्या डबेवाल्यांना देण्याचे घोषित केले आहे.
कोरोनामुळे डबेवाल्यांची आर्थिक स्थिती कोलमडली
जागतिक पातळीवर ज्यांच्या व्यवस्थापनाची नोंद घेतली जाते, अशा मुंबईचा डबेवाला यांची कोरोनामुळे यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्व क्षेत्र अडचणीत सापडले आहेत. त्याला मुंबईचे डबेवालेही अपवाद नाही. घरोघरी, ऑफिसमध्ये डबे पोहोचवणारे डबेवाल्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता या डबेवाल्यांना एचएसबीसी बँकेने मदतीचा हात दिला आहे.
एचएसबीसी बँकेकडून 15 कोटी रुपयांची डब्बेवाल्यांना मदत
एचएसबीसी बँकेने घोषित केलेल्या या मदतीमुळे डबेवाल्यांना, विमा, रेशन, लहान मुलांचे शिक्षण, नव्या सायकली, कुटुंबाला अर्थिक मदत दिली जाणार आहे. यामुळे डब्बेवाल्यांना दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या काळात कार्यालये बंद होती. त्यामुळे डबेवाल्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. लॉकडाऊनमध्ये त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. काही डबेवाल्यांनी आपला व्यवसाय बदलला. कोणी डबेवाले भाजीविक्रेते झाले तर कोणी हमालीचे काम करू लागले तर काही डबेवाल्यांनी थेट गावाची वाट धरली. संपूर्णपणे कोलमडलेला व्यवसाय कोरोनाच्या काळात सावरण्याची चिन्हे दिसत नव्हती. मधल्या काळात काहीशी सूट मिळाल्याने दिलासा मिळेल असे वाटत होते. मात्र लगेच कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा लॉकडाऊन लागले. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. त्यामुळे डबेवाले धास्तावले आहे. अशा परिस्थितीत, एचएसबीसी बँकने दिलेला मदतीचा हात डबेवाल्यांना उभारी देणारा आहे.