मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याची कसलीही भीती नसताना व कुठलीही गटबाजी नसताना अजित पवार यांनी सरकारमध्ये प्रवेश केल्याने सरकार आणखीन मजबूत झाले आहे. पण अजित पवारांची एन्ट्री ही, "बिन बुलाये मेहमान"सारखी झाली असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने जागा वाटपाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. (Seat Allocation Problem) अगोदरच मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही म्हणून शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता होती. त्यातच अजित पवार आणि सरकारमध्ये फक्त प्रवेश केला नाही, (Maharashtra Political Crisis) तर प्रवेश केल्या केल्या ९ मंत्र्यांचा शपथविधीही उरकण्यात आला. यावरून शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता असून संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांनी उघडपणे बोलूनही दाखवले आहे. यापूर्वी भाजपने विधानसभेसाठी मिशन २०० व लोकसभेसाठी मिशन ४५ हे टार्गेट ठेवले आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी शिंदे गटाला भाजपकडून किती जागा देण्यात येतील यावरील चर्चा अंतिम टप्यात येत असताना अजित पवारांच्या झालेल्या एन्ट्रीने जागा वाटपाचा तिढा आता अजून वाढला आहे.
अजित पवारांचा ९० जागांचा दावा : २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने १२४ जागा लढवल्या होत्या व तितक्या जागेचा आग्रह शिंदे गटाने धरला होता. त्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ९० जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ मध्ये विधानसभेच्या १२१ जागा लढवल्या होत्या. अजित पवारांच्या या घोषणेने शिंदे गटातच नाही तर भाजपमध्येही अस्वस्थता आहे. याबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत की, जोपर्यंत निवडणुका लागत नाहीत, तोपर्यंत जागा वाटपाचा प्रश्न निर्णय होणार नाही. आता कोणीही कितीही दावे केले आम्ही इतक्या जागा लढू; पण खरे चित्र हे निवडणुका लागल्यानंतरच स्पष्ट होईल व याबाबत वरिष्ठ नेते योग्यवेळी योग्य निर्णय घेतील असेही बावनकुळे म्हणाले आहेत.
अंतर्गत धुमसते आग : अजित पवार यांचा सरकारमध्ये झालेला प्रवेश व प्रवेश करताच ताबडतोब झालेला मंत्र्यांचा शपथविधी यावरून पहिल्या दिवसापासून रंगलेली चर्चा अद्याप सुरू आहे. शिंदे गटात याबाबत अंतर्गत गटबाजी सुरू झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार होत आहे. याबाबत बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत की, ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यात काहीही सत्य नाही. अजित पवार यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटातील कुठलेही आमदार नाराज नसून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. आमदारांच्या नाराजीच्या चुकीच्या बातम्या या माध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात असल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. परंतु वास्तविकतेत आमदार संजय शिरसाट असतील किंवा आमदार महेंद्र थोरवे यांनी माध्यमांपुढे उघडपणे नाराजी व्यक्त केली असल्याने अजित पवारांच्या प्रवेशाने शिंदे गटात अस्वस्थता आहे. ही अंतर्गत धुमसणारी आग उद्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येईल याची शक्यता नाकारता येणार नाही.