मुंबई Maratha Reservation : गेल्या पंचवीस वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. या लढाईत मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात आरक्षण मिळावं, या मागणीसाठी अनेक आंदोलनं, मोर्चे काढण्यात आले. आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात मराठा समाजाचे 58 मोर्चे राजकीय पक्षांच्या पाठिंब्याविना काढण्यात आले होते. नंतर आघाडी सरकारनं मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं, पण ते आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकू शकलं नाही. मराठा समाजाला आरक्षणाऐवजी विशेष मागास प्रवर्ग म्हणून सवलती देण्याचा निर्णय सरकारनं घेतला. मात्र, त्यालाही आव्हान देण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी समाजाच्या विविध संघटनांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथेही मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं. तेव्हा उपोषणस्थळी लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं पन्हा एकदा नव्यानं पेट घेतला.
आंदोलनानंतर जरांगे नायक : अंतरवली सराटीत झालेल्या लाठीहल्ल्यानंतर जरांगे पाटील मराठा समाजाचे नायक उदयास आले. कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठिंब्याशिवाय जरांगे पाटील यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र करत आंदोलनाला दिशा दिली. राज्यात विविध ठिकाणी घेतलेल्या मनोज जरांगे यांच्या सभांकडं लाखो लोक आकर्षित झाले. त्यांनी उपासलेल्या उपोषणाच्या हत्यारापुढं सरकारनं नमती भूमीका घेतली. त्यानंतर सरकारनं मराठा समाजातील नागरिकांना रेकॉर्ड तपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली. मात्र मराठा समाजाला तातडीनं आरक्षण मिळावं, या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत.
भुजबळ जरांगे वादाची ठिणगी : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही, असं ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. तसंच जरांगे यांची सरसकट आरक्षणाची मागणी अयोग्य असल्याचं सांगत भुजबळ यांनी जरांगे यांची खिल्ली उडवली होती. त्यामुळं मराठा विरुद्ध भुजबळ असा वाद निर्माण झाला होता. त्यामुळं भुजबळांना त्यांच्या मतदारसंघातही मराठा समाजानं प्रवेश दिला नाव्हता. तेव्हा भुजबळ अधिकच जरांगे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करू लागले. भुजबळांच्या या टीकेमुळं मनोज जरांगे मराठा समाजाचे नायक म्हणून उदयास आले.
मागे न हटणारा नायक : मराठा समाजासाठी अनेक नेत्यांनी अनेकदा आंदोलनं केली आहेत. मात्र, त्या सर्व नेत्यांनी प्रत्येक वेळी एक पाऊल मागं घेतलं. मात्र सरकारनं विविध प्रलोभनं देऊनही जरांगे पाटील यांनी याप्रश्नी मागे हटणार नसल्याचा पवित्रा घेतला घेतला. त्यामुळं त्यांच्या या भूमिकेचं मराठा समाजानं स्वागत केल्यानं आज मराठा समाजातील मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी उभा आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची बलिदानाची तयारी असल्यामुळं मराठा आरक्षणाचे नवे नायक म्हणून मनोज जरांगे पाटील यांचा उदय झालाय.
हेही वाचा -