मुंबई Hotel Bademiya : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल 'बडे मिया'च्या आउटलेटवर एफडीएनं कारवाई केली आहे. एफडीएच्या अन्नसुरक्षा विभागानं हॉटेलवर धाड टाकली असता हॉटेलच्या किचनमध्ये झुरळं, उंदीर यांच्यासह सर्वत्र अस्वच्छता दिसून आली. तसेच व्यवस्थापकाकडे हॉटेलचा परवाना देखील नव्हता. त्यानंतर हॉटेलच किचन एफडीएकडून सील करण्यात आलं.
तीन आउटलेटवर अचानक धाडी टाकल्या : मुंबईतील अतिशय प्रसिद्ध अशा हॉटेल 'बडे मिया'च्या एकूण तीन आउटलेटवर एफडीएआयच्या अधिकाऱ्यांनी रात्री अचानक धाड टाकली. या धाडी दरम्यान किचनमध्ये झुरळं, उंदीर आणि मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून आली. त्याचबरोबर एका हॉटेलच्या किचनमध्ये 'फूड अँड सेफ्टी स्टॅंडर्ड ऑफ इंडिया'चं लायसन्स देखील नसल्याचं आढळून आलं. त्यानंतर हे किचन एफडीएकडून सील करण्यात आलं.
खवय्यांची निराशा : मुंबईतील 'बडे मिया' हॉटेलची आउटलेट खवय्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. इथे रात्री उशिरापर्यंत गर्दी पाहायला मिळते. फक्त मुंबईतीलच नाही तर बाहेर गावावरून आलेले पर्यटक देखील या हॉटेलच्या खाण्याचा आस्वाद घेण्यासाठी इथे गर्दी करतात. परंतु एफडीएनं टाकलेल्या धाडीत जे चित्र समोर आलं, त्यामुळे खवय्यांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे. एफडीएनं 'बडे मिया' चं एक किचन सील केलं असलं तरी हॉटेलचे इतर आउटलेट सुरू आहेत.
मावा मिठाई विक्रेते सुद्धा रडारवर : सणासुदीच्या काळात विविध प्रकारच्या मिठाईंची मागणी मोठ्या प्रमाणात असते. ही मिठाई मुख्यत्वे माव्यापासून बनवली जाते. आता या दुकानांवर देखील वैद्यकीय आरोग्य आणि स्वच्छता अधिकारी लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील मावा साठवणूक शीतगृहांची देखील कसून तपासणी करण्याचे आदेश पालिका प्रशासनानं दिले आहेत.
विषबाधा टाळण्यासाठी विशेष मोहीम : मुंबई महापालिकेचं सार्वजनिक आरोग्य खातं, आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खबरदारी घेत आहे. मुंबईमध्ये माव्या पासून तयार करण्यात येणाऱ्या मिठाई विकणाऱ्यांची तपासणी होणार आहे. त्याचबरोबर सणासुदीच्या काळात, दुषित मिठाईनं विषबाधा होऊ नये, यासाठी महापालिकेचे सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांनी १ सप्टेंबर पासून विशेष मोहीम हाती घेतल्याचं माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितलं.
हेही वाचा :