मुंबई: केंद्रीय यंत्रणांच्या नावाने राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत वसूलीचे षडयंत्र रचले जात आहे का याबाबत सविस्तर चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत केली. पोलीस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांचे प्रकरण उघड झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रण केंद्रीय यंत्रणांना बदनाम करीत आहे का अशी शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली होती. राज्याच्या पोलीस दलातील सौरभ त्रिपाठी हे आयपीएस अधिकारी आंगडीया या व्यापा-याकडून आयकर अधिकारी असल्याचे भासवून वसूली करीत असल्याचे उघड झाल्यानंतर राज्य शासनाने सौरभ त्रिपाठी यांना निलबित केले आहे.
शेलार यांनी त्रिपाठीयांच्यावरील कारवाईचे स्वागत केले. या प्रकरणानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करीत नाही ना? केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र तर राज्यातील प्रशसकीय यंत्रणेमध्ये शिजत तर नाही ना? त्रिपाठी सारखे अन्य कोणी अधिकारी वसूली तर करीत नाही ना? त्यांच्या पाठीशी कोण उभे आहे की काय? असे प्रश्न आता उपस्थित होत असून असे असेल तर महाराष्ट्राची आणि देशाची बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असून याप्रकरणी तातडीने शासनाने दखल देऊन आवश्यकता असल्यास चौकशी करावी, अशी मागणी आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली होती . त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याची शासन दखल घेत असून चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.