मुंबई - जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या आंदोलनात एका महिला आंदोलनकर्तीने 'फ्री काश्मीर', असा फलक दर्शविला होता. हा फलक देशभरात चर्चेचा विषय झाला आहे. 'गेटवे ऑफ इंडिया' येथे आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हाही नोंद झाला असून या प्रकाराची चौकशी करू, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान भवनात सांगितले.
फ्री काश्मीर या फलकासंदर्भात आंदोलक महेक यांची काय भूमिका होती हेही जाणून घेऊ. मात्र, महेक यांनी व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या व्हिडिओमधून त्यांची भूमिका आधीच स्पष्ट झाली आहे. त्यांनी इतरांना पाठवलेल्या अन्य संदेशाची ही चौकशी करू, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
महेक यांनी दर्शवलेल्या फलकावरून त्यानी थेट स्वतंत्र काश्मीरची मागणी केली असा त्याचा अर्थ होत नाही. काश्मीरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. तेथील इंटरनेट सेवाही सुरळीत नाही. अनेक नेत्यांना डांबून ठेवण्यात आले होते. जमावाला भाषण बंदी आहे, या संदर्भात हा फलक असल्याचे प्रथम दर्शनी दिसत असल्याचे देशमुख म्हणाले.
हेही वाचा - हिंदुत्ववादी मतदार शिवसेनेपासून दुरावल्याने ती जागा मनसे भरून काढेल - राम कदम