मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील प्रचार सभेदरम्यान हिंदू दहशतवाद देशात नसल्याचे सांगितले. काँग्रेसने हिंदू दहशतवादाचे कारस्थान रचत असल्याचा आरोपही केला. एकीकडे पंतप्रधान मोदी हिंदू दहशतवाद नाकारत आहेत. तर दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) केंद्र सरकारला राज्यातील १२ कट्टर हिंदू संघटनांवर बंदी आणावी, अशा आशयाचा अहवाल पाठवला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गेल्या काही महिन्यात एटीएसकडून राज्यातील औरंगाबाद, ठाणे, नालासोपारा, सातारा, सांगली सारख्या परिसरात कारवाईचा धडाका लावला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, गावठी बॉम्ब, स्फोटक बनविण्याचे साहित्य हस्तगत केले. सद्या हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असून आहे. एटीएसने यासंदर्भात आरोपत्रही दाखल केले आहे. २०११ मध्ये गृहमंत्रालयात जहाल हिंदू संघटनांवर बंदी घालण्याचा अहवाल देण्यात आला. त्यानंतर २०१८ मध्ये महाराष्ट्र एटीएसकडून पुन्हा असाच अहवाल पाठविण्यात आला होता.
महाराष्ट्रातील गेल्या काही महिन्यातील कारवाई -
नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला पहिला आरोपी वैभव राऊत याच्यासह १२ जणांविरुद्ध ६हजार ४८२ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
नालासोपारा येथूनअटक करण्यात आलेले वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर यांच्यावर स्फोटके बाळगल्याप्रकरणी १० ऑगस्ट २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर, अविनाश पवार, विजय लोधी, वासुदेव सुर्यवंशी, प्रविण रंगास्वामी, भारत कुरणे, अमोल काळे, अमित बड्डी, गणेश मिथून यांच्याविरुद्ध एटीएसने आरोपपत्र दाखल केले आहे.
अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे वेगवेगळ्या हिंदूत्ववादी संघटनांचे आहेत. त्यांनी हिंदुराष्ट्र निर्मितीसाठी प्रेरित होवून समविचारी लोकांची टोळी उभी केल्याचा आरोप या आरोपपत्रात करण्यात आलेला आहे. सोबतच सनातन संस्थेच्या क्षात्रधर्म साधना या पुस्तकात नमुद केल्याप्रमाणे हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी ते प्रयत्न करत आहेत असा आरोप आरोपपत्रात दाखल करण्यात आला आहे.