मुंबई - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( Chhatrapati Shivaji Maharaj Terminus ) येथील हिमालय पूल ( Himalaya Bridge ) १४ मार्च २०१९ मध्ये कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या तीन वर्षात या पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. यामुळे रेल्वे प्रवासी तसेच येथील स्थानिकांना रस्ता ओलांडून प्रवास करावा लागत आहे. मात्र आता पुढील सहा महिन्यात हा पूल प्रवाशांच्या सेवेत असेल अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
स्टेनलेस स्टीलचा पूल - मुंबई महापालिकेकडून हिमालय पूल ( Himalaya Bridge from Municipal Corporation ) उभारला जात आहे. लोखंडी पुलाला पावसाळ्यात गंज पकडतो. यासाठी आता हिमालय पूल स्टेनलेस स्टीलचा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सीएसएमटी स्थानकातून १ नंबर प्लॅटफॉर्मवरून ठाणे बाजूने बाहेर आल्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. याच उपयोग जेष्ठ नागरिकांसह गरोदर महिलांना होईल. पुलाच्या पिलर उभारण्याचे काम सुरु आहे. स्टेनलेस स्टिलचा गर्डर बनवण्याचे काम सुरु आहे. हा गर्डर आणून पिलरवर ठेवला जाणार आहे असे वेलरासू यांनी सांगितले.
गंज न पकडणारे स्टेनलेस स्टील - लोखंडी पुलाला पावसाळ्यात गंज पकडतो. त्यामुळे मुंबईत नव्याने बांधण्यात येणारे पूल स्टेनलेस स्टीलचे बांधण्यात येत आहेत. हिमालय पूल हा स्टेनलेस स्टीलचा असून पावसाळ्यात गंज पकडण्याचा धोका नसेल. त्यामुळे स्टेनलेस स्टील पूल स्टेनलेस स्टीलचा असून वर्षानुवर्षे टिकणारा आहे.
मुंबईत पालिकेचे २७४ तर रेल्वेचे ४५५ पूल - मुंबईत महापालिकेच्या हद्दीत २७४ तर रेल्वेच्या हद्दीत ४५५ पूल आहेत. अंधेरी येथील गोखले पूल, हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांचे स्क्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. यात अनेक पूल धोकादायक असल्याचे समोर आले. काही पुलांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वे हद्दीतील पुलांच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडून रेल्वेला पैसे दिले जातात. पालिकेच्या पूल विभागाने २०१० पासून २०१९ पर्यंत मध्य रेल्वेला ९४ कोटी ४४ लाख ९१ हजार ८७० रुपये तर, पश्चिम रेल्वेला २००८ ते २०१८ या कालावधीत १८ कोटी ५ लाख २४ हजार १७३ रुपये असे एकूण ११४ कोटी ५० लाख १६ हजार ४३ रुपये पुलांच्या डागडुजीसाठी दिले आहेत.