मुंबई - मुंबईत शुक्रवारी (दि. 10 जून) रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुंबईत पाऊस ( Rain in Mumbai ) दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. गेल्या 24 तासात मुंबई शहर विभागात सर्वाधिक तर पूर्व उपनगरात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शहर विभागात पाऊस - मुंबईत शनिवारी (दि. 11 जून) सकाळी 8 ते आज रविवार (दि. 12 जून) सकाळी 8 या 24 तासात शहर विभागात 42.52, पूर्व उपनगरात 14.84 तर पश्चिम उपनगरात 21.45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहर विभागात सर्वाधिक पाऊस पडला तरी कुठेही पाणी साचण्याच्या घटना नोंद झालेल्या नाहीत. रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत आहेत.
ढगाळ वातावरण - मुंबईत आज (दि. 12 जून) ढगाळ वातावरण राहणार आहे. उपनगरात पावसाच्या सरी पडण्याची तर काही ठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
समुद्राला भरती - आज सकाळी 10.19 वाजता समुद्राला 4.25 मीटरची, रात्री 10.11 वाजता 3.95 मीटरची तर उद्या (दि. 13 जून) 4.20 मीटरची भरती असणार आहे. यावेळी समुद्र किनारी नागरिक आणि पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - न्या. एस.एस.शिंदे, मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने दोन दिवसात केली 190 प्रकरणांवर सुनावणी