मुंबई - कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत माणसांबरोबरच भटक्या प्राण्यांची देखील उपासमार होत आहे. ही बाब लक्षात घेऊन माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी त्यांच्या विभागात रस्त्यावर फिरणारे भटके श्वान, मांजरी उपाशी राहू नये, यासाठी प्राणी मित्रांकडे खाद्य सुपूर्द केले.
उन्हाळ्यात प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात तहान लागते. त्यामुळे पाण्यावाचून प्राण्यांचे हाल होऊ नयेत यासाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कुठेही भुकेल्या माणसासोबतच कोणत्याही मुक्या प्राण्याला भूक आणि पाण्यावाचून वंचित ठेऊ नका, असे आवाहन घोसाळकर यांनी कार्यकर्त्यांना तसेच नागरिकांना केले आहे. माणुसकीचे हे दर्शन घडवून निसर्गाचे, समाजाचे आता खऱ्या अर्थाने पांग फेडण्याची वेळ आहे, असा विचार करुन प्रत्येकाने आपापल्या परीने शक्य ते मदतकार्य करावे. माणूस असो वा मुका जीव कुणीही भुकेला राहू नये, याची काळजी घ्या, असेही घोसाळकर यांनी सांगितले.
हेही वाचा - 'विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांना 5 वर्षांसाठी मुदतवाढ द्या'
अनेक ठिकाणी प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अभिषेक यांचे प्राणी प्रेम सर्वश्रुत आहे. आपल्या प्रभागात त्यांनी खास मुंबईतील पहिले एकमेव पेट पार्क उभारत याची ग्वाही दिली होती. शिवसेना युवा नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पार्कचे उद्घाटन झाले. ठाकरे यांनीही घोसाळकर यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले होते.