रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील महानगरी टाईम्स' चे झुंजार पत्रकार शशिकांत वारीशे यांची भ्याड हत्या करण्यात आली. या प्रकरणी संशयित पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पंढरीनाथ आंबेरकर याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राज्यातील पत्रकार संघटनांकडून लावून धरली. त्यानंतर आंबेरकर याला अटक करण्यात आली. राज्य शासनाने या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे. स्थानिक पोलीसांकडून तपास सुरू आहे.
शासनाकडून 25 लाखांच्या मदतीची घोषणा : पत्रकार शशिकांत वारीसे हे घरातील कर्तापुरुष होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, आई असा परिवार आहे. वारीसे यांच्या हत्येनंतर कुटुंबातील मुलगा आणि आईवर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून केली जात होती. रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, ही मागणी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पुन्हा मांडली.
मुलाला कायमची नोकरी : पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख, इतर माध्यमातून 15 लाख अशी पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. याची घोषणा पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरी येथे केली. याशिवाय वारिसे यांच्या मुलाला कायमची नोकरी देण्याची जबाबदारीही सामंत यांनी स्वीकारली आहे.
हेही वाचा - Chandrashekhar Bawankule : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत २०० प्लस आमदार निवडून येतील - चंद्रशेखर बावनकुळे