मुंबई - हवामान विभागाच्या शक्यतेनुसार आज बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. त्यामुळे अरबी समुद्रावरून येणाऱ्या पश्चिमेकडील वाऱ्यांची तीव्रता वाढली आहे. परिणामी पुढील 24 ते 48 तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी वर्तविला आहे.
मागील 24 तासांमध्ये मुख्यत: मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वातावरणात त्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या पश्चिमेकडील वाऱ्यांची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे कोकणातील पश्चिम किनारपट्टी भागात आणि मुंबई, ठाणे परिसरामध्ये त्याचा प्रभाव दिसेल. यामुळे पुढील 24 ते 48 तासांमध्ये या भागात मुसळधार पाऊस पडू शकतो आणि काही भागात अतिवृष्टी होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण कोकणात मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यासाठी आज आणि उद्या रेड अलर्ट दिला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
गेल्या 24 तासांतील आज सकाळी नोंदविलेले तापमान -
मुंबई शहर - तापमान 30. 5 अंश से. (कमाल), 24.2 (किमान)
मुंबई उपनगर - तापमान 32. 0 अंश से. (कमाल), 24.0 (किमान)
गेल्या 24 तासांतील आज सकाळी नोंदविलेला पाऊस -
मुंबई शहर - 252.2 मिमी
मुंबई उपनगर - 268.6 मिमी
1 जूनपासून झालेला पाऊस - 2019 मिमी
हवेतील आर्द्रता ( मुंबई) - 92 टक्के