मुंबई - नवी मुंबई आणि ठाण्यासह मुंबई शहरात आज दिवसभर पाऊस सुरूच आहे. मुंबईत पावसाने जोर पकडला असून काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. उपग्रह आणि रडारने टिपलेल्या चित्रानुसार शहरावर सात ते आठ किलोमीटर उंच ढग दाटून आले आहेत. मागील काही तासात मुंबई, ठाणे येथे 40 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.
18 जूनला मुंबईत आकाश सामन्यत: ढगाळ राहून मुसळधार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. त्यानुसार आज सकाळपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली. उपनगरातील काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळपर्यंत सांताक्रूझ वेधशाळेने मुंबईचे तापमान कमाल 32.6 तर किमान 27 असे नोंदवले. तर कुलाबा वेधशाळेत कमाल 31.1 किमान 26.8 तापमान नोंदवले गेले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही तासात मुंबई आणि ठाण्यात मुसळधार तर दक्षिण कोकणात अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात बहुतांशी ठिकाणी मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील 5 दिवस राज्यात सर्वत्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 18 तारखेपर्यंत सर्वदूर 75 ते 100 टक्केपर्यंत पाऊस पडेल. याच काळात काही ठिकाणी 64.5 मिलिमीटर ते 115.5 मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.