मुंबई - ठाणे, रायगड, रत्नागिरीसह मुंबईमध्ये येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला. मागील 24 तासात बऱ्याच ठिकाणी मुसळधार आणि अति मुसळधार पावसाची नोंद झाल्याची निरीक्षणे आली आहेत, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली.
उद्यापर्यंत पावसाची तीव्रता काहीशी कमी होईल. मात्र, मुंबईसह कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता कायम असेल. महाराष्ट्राच्या अनेक भागात पुढील 24 ते 48 तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या भागांमध्ये मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी आणि नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन होसाळीकर यांनी केले.
पुढील हवामानाचा अंदाज:
१५ जुलैः कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
१६ जुलै : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
१७-१८ जुलै : कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.