मुंबई - मुंबईत 13 आणि 14 जून रोजी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय कोकण आणि विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. तर राज्यातील अनेक भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली.
मुंबई, उपनगरात रविवारी व सोमवारी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मात्र, त्याआधीच मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. आजही मुंबई व उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, कोकण किनारपट्टीलाही अतिवृष्टीचा देण्यात आला आहे.
मुंबईत गेले 2-3 दिवस कोसळत असलेल्या पावसाच्या सरी उद्या (रविवारी) जोराने बरसतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे मुंबईत रविवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे.
- रेल्वे सेवा विस्कळीत
हार्बर मार्गावरील चुनाभट्टी रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प तर कुर्ला ते दादर रेल्वे स्थानकांदरम्यान वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
- घरावर भिंत कोसळून मोठे नुकसान
चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात असलेल्या विश्व गौतम नगरमध्ये घरे कोसळण्याची घटना घडली आहे. यात सुदैवाने कोणती ही जीवितहानी झालेली नाही.
- वाहतूक ठप्प
जोरदार पडलेल्या पावसामुळे हिंदमाता, सायन, किंगसर्कल, अंधेरी सबवे यासह आदी सखल भागात पाणी साचले आहे. पाणी साचल्याने वीरा देसाई रोड, साईनाथ सबवे, अँटॉप हिल रोड नंबर 7, बांद्रा नॅशनल कॉलनी, हिंदमाता, कुर्ला कमानी, गांधी मार्केट, संगम नगर वडाळा, सायन रोड नंबर 24 या ठिकाणची वाहतूक वळवण्यात आली आहे. तर चुनाभट्टी आणि सायन येथे पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
- मुंबईत 11 जून 8 सकाळी ते 12 जून सकाळी या 24 तासांत पावसाची झालेली नोंद
विभाग | पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये) |
शहर विभाग | 79.7 |
पूर्व उपनगर | 89.3 |
पश्चिम उपनगर | 92.4 |
कुलाबा | 90 |
सांताक्रूझ | 107 |
- दुपारी 12 वाजेपर्यंत पावसाची झालेली नोंद खालीलप्रमाणे
विभाग | पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये) |
दादर | 56 |
माटुंगा | 54 |
धारावी | 53 |
चेंबूर | 61 |
गोवंडी मानखुर्द | 56 |
कुर्ला | 51 |
विलेपार्ले | 43 |
हेही वाचा - धोकादायक इमारतींमुळे मुंबईतील 45 कुटुंबांचा जीव टांगणीला