मुंबई - महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. जोरदार पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत मोठी जीवितहानी कोकण, रायगड, सातारा जिल्ह्यामध्ये झाली आहे. मात्र, अजूनही पावसाचा धोका कायम आहे. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील(शनिवारपासून) 2-3 दिवस, खासकरून कोकणात व मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच सोमवारपासून (26 जुलै) पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होईल, असे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे.
पुढील 24 तासात अतिमुसळधार
२३ आणि २४ जुलै या दोन दिवसामध्ये कोकण, गोवा आणि किनारपट्टीला लागून असलेल्या पश्चिम घाट, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये कालपासून (22 जुलै) कोसळणाऱ्या पावसाने पुरती वाताहत केली आहे. आत्तापर्यंत पावसामुळे राज्यभरात 70 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. पुढच्या २४ तासामध्ये देखील हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना?
सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला शनिवारी ( 24 जुलै) रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. रविवारसाठी (25 जुलै) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.
महाबळेश्वरमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस
महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 48 तासात 1078 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर सर्वाधिक पाऊस होण्याची दुसरी वेळ आहे. सर्वाधिक पाऊस आगस्ट २००८ मध्ये झाला असल्याची माहिती हवामान विभागकडून देण्यात आली आहे.
पावसाच्या दुर्घटनेतील मृत्यूचे आकडे -
* अपरांत हॉस्पिटल, कोविड सेंटर - 8 रुग्णांचा मृत्यू
* तळीये (महाड) – 38 मृतदेह हाती
* आंबेघर (सातारा) – 12 जणांचा मृत्यू
* पोलादपूर (रायगड) – 11 जणांचा मृत्यू
* वाई (सातारा) – 2 महिलांचा मृत्यू
हेही वाचा - Weather Update: पुढचे ४ दिवस राज्यात मुसळधार, हवामान विभागाचा अंदाज