मुंबई- शहरात गेले काही दिवस पावसाने दांडी मारली होती. मात्र, मंगळवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले. याचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही झाला. त्यामुळे सकाळीच कामावर निघालेल्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबईत दरवर्षी जूनच्या मध्यात पाऊस पडतो. यावर्षी मात्र जूनच्या शेवटी पावसाला सुरुवात झाली. काही दिवस पाऊस पडल्यावर पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, काल मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने शहरात हजेरी लावल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून, चाकरमान्यांना येजा करण्यात त्रास होत आहे. पावसामुळे हिंदमाता, सायन, माटुंगा, वांद्रे, गोरेगाव आदी सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे या भागातील बेस्ट आणि रस्ते वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली होती. पावसाचा परिणाम रेल्वेवरही झाला असून मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिट, तर हार्बर रेल्वेची वाहतूकही उशिराने सुरू असल्याचे समजते आहे.
...इतकी झाली पावसाची नोंद
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ५.३० पर्यंत कुलाबा १७१.८ मिलिमीटर तर सांताक्रूझ येथे ५८.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, मुंबई महापालिका व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री १२ ते सकाळी ७ वाजेपर्यंत शहर विभागात कुलाबा येथे १६६ मि.मी, मलबार हिल येथे १६४ मि.मी, डी वॉर्ड येथे १६२ मि.मी, आय हॉस्पिटल येथे १५८ मि.मी, सी वॉर्ड येथे १५२ मि.मी, पूर्व उपनगरात चेंबूर अग्निशमन केंद्र येथे १०२ मि.मी, कुर्ला एल वॉर्ड येथे ९२ मि.मी, एम वेस्ट येथे ८१ मि.मी, पश्चिम उपनगरातील वांद्रे येथे १३४ मि.मी, सांताक्रूझ एच वेस्ट येथे १२१ मि.मी, विलेपार्ले येथे १०२ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
....या मार्गांवर वळविली बेस्ट सेवा
- हिंदमाता येथील वाहतूक हिंदमाता पुलावरून वळवण्यात आली आहे.
- सायन रोड नंबर २४ येथील वाहतूक रोड नंबर ३ वरून वळवली आहे.
- माटुंगा गांधी मार्केट येथील वहातूक भाऊ दाजी लाड मार्गावरून वळवली आहे.
- अलंकार टॉकीज ते भेंडी बाजार येथील वाहतूक दोन टांकी ते जेजे हॉस्पिटल या मार्गाने वळवली आहे.
- प्रतीक्षा नगर येथील वाहतूक जयशंकर यागणिक मार्गाने वळवली आहे.
- गोरेगाव सिद्धार्थ नगर रुग्नालय येथील वाहतूक गजानन महाराज चौक या मार्गाने वळवली आहे.
- वांद्रे एस व्ही रोड नॅशनल कॉलेज येथील वाहतूक लिंक रोड वरून वळवली आहे.