मुंबई - मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. या आगामी अर्थसंकल्पात कोविडच्या पार्श्वभूमीवर १ कोटी नागरीकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. तसेच मुंबई पालिकेची आरोग्य सेवा बळकट केली जाणार आहे. पालिकेच्या मुख्य रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी उपनगरातील रुग्णालयांचा विस्तार, सीटी स्कॅन, एमआरआयची सुविधा, नवे वैद्यकीय अभ्यासक्रम, ओपीडी ऑन व्हील अंतर्गत ज्येष्ठांना घरबसल्या आरोग्य चाचण्या करता येणार आहेत. याकरिता १ हजार २०६ कोटींची तरतूद केल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली. कांदिवली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात सुपर स्पेशालिटी विंग आणि नाहूर येथे मल्टीस्पेशालिट क्लिनीक उभारणीसाठी आराखडा बनविण्याचे काम सुरु असल्याचेही ते म्हणाले.
१ कोटी नागरीकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट्य -
सध्या कोविड लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु आहे. मात्र, मुंबईतील १ कोटी नागरीकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट्य मनपाने ठेवले आहे. तसेच १०० वर्षांपूर्वी प्लेगसाठी तयार करण्यात आलेल्या कस्तुरबा रुग्णालयाचा कोविडनंतर विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी नवी इमारती बांधण्यात येणार आहे. लवकरच यासाठी निवीदा प्रक्रिया सुरु केली जाईल, अशी माहितीही आयुक्तांनी दिली. आगामी काळात अशा स्वरुपाची संकटे आल्यास त्यांचा मुकाबला करणे, शक्य व्हावे, हा यामागचा उद्देश आहे.
दवाखाने, प्रसूती गृहांची दुरुस्ती -
महापालिकेची २९ रुग्णालये, २८७ आरोग्य केंद्र आणि दवाखाने तसेच २८ प्रसुतीगृहांच्या दुरुस्तांचे काम हाती घेतले आहे. यासाठी ८२२ कोटी ७२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. पुढील दोन वर्षात ही कामे पुर्ण होतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मुख्य रुग्णालयात सीटी स्कॅन, एमआरआय सुविधा सक्षम केली जाणार आहे. केईएम, नायर रुग्णालयात एमआरआय, तर लोकमान्य टिळक, केईएम आणि नायर रुग्णालयात तीन अत्याधुनिक सीटीस्कॅन सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. याकरिता १७ ते २० कोटी खर्च अपेक्षीत आहे. गोवंडी शताब्दी आणि कुर्ला भाभा रुग्णालयात पीपीई माॅडलव्दारे दोन सीटीस्कॅन मशिन उपलब्ध केल्या जाणार आहेत.
ज्येष्ठ नागरीकांना घरपोच आरोग्य सेवा -
ज्येष्ठ नागरीक, गर्भवती महिला, दिव्यांग अशा नागरिकांना घरीच आरोग्य सेवा आणि सल्ला देण्यासाठी फिरते दवाखाने सुरु केले जाणार आहेत. शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर, असा प्रत्येकी १ फिरता दवाखाना सुरु केला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य चाचण्याही घरी करता येतील. तसेच युनानी, आयुर्वेद या सारख्या इतर उपचार पध्दतीचा वापर केला जाणार आहे. याकरिता ५ कोटींची तरतूद केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवे अभ्यासक्रम -
सहा उपनगरी रुग्णालयात मेडिसीन, जनरल सर्जरी, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, बालरोगशास्त्र, ऑर्थेपेडिक, नाक, कान, घसा अशा विविध विभागांमध्ये ८६ डीएनबी अभ्यासक्रम सुरु केला जाणार आहे. २३ कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. तर, आयुष्यमान भारत आणि विविध योजनांच्या माध्यमातून ही रक्कम परत मिळू शकते. कुर्ला येथील भाभा, घाटकोपर येथील राजावाडी, गोवंडी येथील शताब्दी, कांदिवली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सांताक्रुझ येथील देसाई आणि वांद्रे भाभा या रुग्णालयात हे अभ्यासक्रम सुरु केले जातील. त्यातून अतिविशेष सेवांसाठी डॉक्टर उपलब्ध होणार आहेत.
नर्सिंग स्कुलचे रुपांतर नर्सिग महाविद्यालयात -
पालिकेच्याच्या नर्सिंग स्कूलचे रुपांतर नर्सिग महाविद्यालयात करुन बीएससी. नर्सिंग हा अभ्यासक्रम सुरु केला जाणार आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वैद्यकिय पदवी अभ्यासक्रमाच्या जागांमध्येही वाढ केली आहे. लोकमान्य टिळक आणि विलेपार्ले हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकिय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागा १५० वरुन २००, तर परळ येथील जीटी महाविद्यालयातील १८० जागा १५० आणि नायर वैद्यकीय महाविद्यालयातील जागांची संख्या १२० वरून १५० केल्या आहेत.
उपनगरातील रुग्णालये बळकट -
मुंबई पालिकेच्या मुख्य रुग्णालयात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतात. मुंबई महानगर प्रदेशासह राज्यभरातून रुग्ण पालिका रुग्णालयात दाखल होतात. मुख्य रुग्णालयांवर ताण येतो. हा ताण कमी करता यावा, याकरिता उपनगरातील रुग्णालयांचे बळकट केले जाणार आहेत. तज्ञ डॉक्टरांची यासाठी नेमणूक केली जाईल. तसेच उपनगरात डीएनबी अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी वैद्यकिय १७२ शिक्षकांची कंत्राटी पध्दतीने भरती केली जाणार आहे. तसेच मुख्य रुग्णालयात डॉक्टरांच्या भरतीलाही प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
हेही वाचा - 'बीएमसीच्या रिकाम्या तिजोरीचा नुसता खडखडाट, कारभाऱ्यांचा उगाच बाजीरावांचा थाट '