मुंबई - पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त गावांमध्ये आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहेत. यासाठी प्रत्येक गावामध्ये आरोग्य विभागाकडून कॅम्प सुरू करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन केंद्र तयार केला असून, प्रत्येक जिल्ह्याला तातडीचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मुसळधार पावसाने अवघ्या महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. त्यातच महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा आणि सांगली या जिल्ह्यामध्ये पुराने हाहाकार उडवला आहे. आता यातील काही जिल्ह्यात पूर परिस्थिती निवळली असली तरी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहू शकतो. याचा विचार करत आरोग्य विभागाकडून गावागावांमध्ये आरोग्य कॅम्प सुरू करण्यात आले असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमधून त्यांनी ही माहिती दिली.
सहा जिल्ह्यातील 496 गावांना पुराचा फटका बसला आहे. या गावात जवळपास 16 हजार कुटुंब पुरामुळे बाधित झाली. या बाधित झालेल्या कुटुंबांचा आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. तसेच साथीचे रोग होऊ शकतात. यासाठी प्रत्येक गावांमध्ये आरोग्य कॅम्प सुरू करण्यात आलं आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि औषधासाठी प्रत्येक जिल्ह्याला तातडीचा निधी देखील उपलब्ध करून देणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
लहान गाव असेल तर, गावांमध्ये सुरू करण्यात आलेल्या आरोग्य कॅम्पमध्ये एक डॉक्टर आणि एक परिचारिका तर, मोठं गाव असेल त्यासाठी दोन डॉक्टर आणि चार आरोग्य कर्मचारी अशी टीम तयार करण्यात आल्या आहेत. तसेच पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
पुरानंतर गावागावांमध्ये रोगराई पसरण्याची भीती असते. त्यामुळे प्रत्येक गावात कीटकनाशकाची फवारणी करण्यात येणार आहे. तसेच पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची उपलब्धता आरोग्य विभागाकडून करून दिली जाणार असून पूर भागातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात येणार आहेत.
कोरोना संबंधित काळजी घेणार -
ज्या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला, त्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने लवकरात लवकर पावले उचलण्याची गरज असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या सहा जिल्ह्यामध्ये कोरोना संबंधित तपासण्या केल्या जाणार आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे लागेल असेही यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले.
निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात विचार सुरू -
ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अगदी कमी प्रमाणात आहे किंवा नगण्य आहे अशा जिल्ह्यांमध्ये निर्बंध उठवण्यात संदर्भात विचार सुरू असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मात्र याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही यावेळी ते म्हणाले.
केंद्रीय आरोग्य मंत्री यांची घेणार भेट -
राज्यात सातत्याने लसीचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे अनेक वेळा राज्यांमधील लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागतात. दिवसाला पंधरा लाख लोकांचं लसीकरण करण्याची क्षमता राज्याची असल्याने केंद्र सरकारने तातडीने महाराष्ट्राला लसीचा अधिकचा पुरवठा करावा अशी मागणी आरोग्य मंत्री यांनी केली आहे. यासोबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची यामुद्यावर दिल्लीला जाऊन भेट घेणार असल्याचं देखील आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.