मुंबई - पुण्यात पांडुरंग रायकर या पत्रकाराला रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. पुण्यासारख्या शहरात असा प्रकार का घडला, त्याचा तपास केला जाईल आणि यापुढे अशी घटना होणार नाही. गरजूंना रुग्णवाहिकेची तत्काळ सोय करावी, यासाठी राज्यातील सर्व आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात कोरोनाचे संकट असून यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे आणि त्याच भूमिकेतून राज्यात सर्वच ठिकाणी कामे सुरू आहेत. मात्र, पुण्यात एका पत्रकाराला रुग्णवाहिका न मिळणे ही घटनाच मोठी दुर्दैवी असल्याचे टोपे म्हणाले. कोरोना हा कोणालाही होतो मंत्री असो किंवा सामान्य माणूस. कोरोना प्रादुर्भावापासून सुरक्षा करणे, हे आपले काम आपण केले पाहिजे. परंतु, काही श्रीमंत लोक आईसीयू हवी म्हणून कायम अट्टहास करतात आणि गरज नसताना बेड मिळवतात, त्यामुळे एखाद्या गरजू रुग्णाला बेड भेटत नाही, असे दिसते. मात्र, यापुढे पुण्यात खासगी रुग्णालयात बेड मिळणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठीची दक्षता घेतली जाईल, असेही टोपे म्हणाले.
हेही वाचा - पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन
राज्यातील आघाडी सरकारसंदर्भात टोपे म्हणाले की, पारदर्शक आणि प्रामाणिकता या दोन शब्दांवर महाविकास आघाडी कोरोना विषयावर कामगिरी करते. टेस्टिंगवर आमचा भर आहे. विरोधक म्हणत आहेत ते चुकीचे आहे. मी स्वतः आयटी पीसीआरचे दर कमी करण्याचा पाठपुरावा करतोय. हे दर आणखी 1200 ते 1300 पर्यंत आणले जातील. तसेच मास्क दर सुद्धा नियंत्रणामध्ये आणणार आहोत. यावर पुन्हा बैठक घेणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. राज्यात कोरोनाचे संकट असले तरी महाविकास आघाडी जनतेसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.