मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र, प्लाझ्मा थेरेपीने रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून कोरोना रुग्ण बरे करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
प्लाझ्मा थेरेपीचा देशभरात मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मात्र, सध्या प्लाझ्मा दान करणाऱ्यांची उणीव भासत आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या रक्तामधून प्लाझ्मा काढला जातो. मात्र, पुन्हा कोरोनाची लागण होण्याच्या भितीपोटी बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. रक्तपेढी यांच्या माध्यमातून प्लाझ्मा थेरपी सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने याबाबत काही निकष ठरवून दिले आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या शरीरातून 'एफ फेरॅसीस' उपकरणाने प्लाझ्मा काढणे बंधनकारक आहे. मात्र, सध्या रक्तपेढ्या कंपोनंट पद्धतीने प्लाझ्मा काढत आहेत. दोन्ही पद्धतींना फायदा सारखचा आहे. त्यामुळे कंपोनंट पद्धतीला मान्यता द्यावी, अशी मागणी रक्तपेढ्या फेडरेशनने राज्य सरकारकडे केली होती. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी बोलून याबाबत परवानगी देण्याची मागणी केली आहे, टोपे यांनी सांगितले.
राज्यात जवळपास पावणेदोन लाख कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यापैकी मुंबईत फक्त 10 ते 15 रुग्ण प्लाझ्मा थेरपीसाठी पुढे आले आहेत. यासाठी कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार करणे जिकिरीचे काम झाले आहे. महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलनेदेखील कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्याची आवश्यकता असल्याचे राज्य सरकारला सांगितले होते.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात कोरोनाच्या विषाणूंचा सामना करू शकणाऱ्या अँटिबॉडी तयार झालेल्या असतात. त्यात प्लाझ्माच्या माध्यमातून कोरोनाची लागण झालेल्या दुसऱ्या रुग्णांच्या शरीरात सोडून त्यातून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचे अनेक रुग्णांच्याबाबतील दिसून आले आहे. रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर २१ ते २८ दिवसांमध्ये त्याला प्लाझ्मा दान करता येतो. १५ दिवसांतून एकदा प्लाझ्मा दान करणे शक्य असते. ४ महिन्यांपर्यंत एखादा रुग्ण प्लाझ्मा दान करू शकतो.