मुंबई : मुंबई मधील रस्ते फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. फेरीवाल्यांमुळे सामान्य मुंबईकरांना रस्त्यावरून चालणे मुश्कील होते. काही ठिकाणी ट्रॅफिक जाम होते. यावर उपाय म्हणून पालिकेने (BMC) फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय (hawker policy will be implemented in Mumbai) घेतला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींची नेमणूक केली जाणार आहे. यामुळे लवकरच फेरीवाला क्षेत्रात पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार असल्याने मुंबईतील रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत.
फेरीवाल्यांचे अद्याप पुनर्वसन नाही : मुंबईत रेल्वे स्थानक तसेच अन्य ठिकाणी फेरीवाल्यांनी मोकळ्या जागा, रस्ते, फूटपाथवर अतिक्रमण करून जागा व्यापल्या आहेत. प्रवाशांना येथून ये- जा करण्यासाठी कसरत करावी लागते आहे. सणांच्या कालावधीत दादर, माटुंगा, कुर्ला, अंधेरी, बोरिवली, घाटकोपरसह अनेक रेल्वे स्थानक व इतर भागात पुन्हा फेरीवाल्यांनी व्यवसाय थाटले आहेत. यामुळे होणाऱ्या त्रासामुळे नागरिक आणि वाचन चालक त्रस्त आहेत. यासाठी मुंबई महापालिकेने २०१४ मध्ये फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी १ लाख २८ हजार ४४४ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. पालिकेने केलेल्या आवाहनानुसार तब्बल ९९ हजार ४३५ फेरीवाल्यांनी अर्ज केले होते. या अर्जाची छाननी केली असता १५ हजार ३६१ फेरीवाले पात्र झाले आहेत. सर्वेक्षण व इतर प्रक्रिया पूर्ण होऊनही पात्र फेरीवाल्यांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन करा तसेच सर्व पात्र फेरीवाल्यांना परवाने देण्याची कार्यवाही सुरु करा अशी मागणीही लोकप्रतिनिधी, फेरीवाल्यांच्या संघटनांकडून करण्यात आली आहे.
फेरीवाला प्रतिनिधींची नियुक्ती होणार : मुंबईमध्ये फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेने टाऊन वेडिंग कमिटी नियुक्त केली आहे. या कमिटीमध्ये फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींची तसेच स्थानिक नगरसेवकांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पालिकेने फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. फेरीवाल्यांचे प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी संबंधित प्रतिनिधींना कामगार आयुक्तांच्या माध्यमातून निवडून येणे आवश्यक आहे. ही राहिलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. येत्या आठवडाभरात कामगार आयुक्तांसोबत बैठक घेऊन निवडणूकीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कामगार आयुक्तांसोबत बैठक घेऊन याबाबत पालिकेकडून नियोजन केले जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर फेरीवाला धोरणानुसार पात्र फेरीवाल्यांच्या जागा निश्चित करून ओळखपत्र दिले जाईल, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.
दादरमधील फेरीवाल्यांना शिस्त लावणार : दादर रेल्वेस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असून रोज प्रवाशांची मोठी वर्दळ असते. असे असताना स्थानकाबाहेर असलेल्या फुल मार्केट परिसरात वाट अडवून व्यावसायिक आपले व्य़वसाय थाटत असल्याने प्रवाशांना कसरत करून चालावे लागते. मोकळ्या जागा फेरीवाल्याने व्यापून जात असल्याने प्रवाशांना चालणे कठीण होते. शिवाय परिसरात अस्वच्छता निर्माण होते. त्यामुळे फेरीवाल्यांना व्यवसाय लावताना शिस्त लागावी व प्रवाशांना स्थानकात ये- जा करण्यासाठी सोपे जावे, या उद्देशाने पालिकेने कारवाई मोहिम सुरु केली आहे. सकाळी सहा वाजल्य़ापासून पालिकेचे अधिकारी येथे उपस्थित राहत असून अतिक्रमण करणा-यांवर कारवाई केली जात असल्याचे, सपकाळे यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत ही कारवाई तीव्र केली जाणार असल्याचे जी- उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले.
धोरणासाठी अशी झाली प्रक्रिया : - २०१४ मध्ये १ लाख २८ हजार ४४४ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण. संपूर्ण मुंबईतून आलेले फेरीवाल्यांचे अर्ज - ९९ हजार ४३५, छाननीनंतर १५ हजार ३६१ फेरीवाले पात्र, ४०४ मार्गांवर ३० हजार ८३२ फेरीवाले निश्चित.