मुंबई - मुंबईत मागील काही दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरावर मोठे संकट आले होते. अनेकांना नाहक प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे मुंबईत खूप मोठे नुकसान झाल्याने, आम्ही १० जुलैला मुंबईत आलो आणि भगवान इंद्र देवांना विनंती करून मुंबईतील मुसळधार पाऊस थांबवला. त्यामुळे मुंबईवर आलेले संकट टळले, असा अजब दावा बिहारमधील हरिप्रसाद उर्फ हरिनंदन बाबा यांनी केला आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात यासाठी आपला दावा आणि त्यासाठीचा खुलासा करण्यासाठी आले असता त्यांनी ही माहिती 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
बिहार जिल्ह्यातील मुंगेर येथे हरिनंदन बाबा यांनी मागील अनेक वर्षांपासून भगवान इंद्रदेवांची आराधना करून इंद्रदेवाला प्रसन्न करण्याची शक्ती आत्मसात केली आहे, असा त्यांनी दावा केला आहे. मुंबईत मालाड येथे झालेल्या दुर्घटनेची माहिती त्यांचे मित्र व स्वामी विवेकानंद आध्यात्मिक संस्थेचे प्रमुख आशिष योगी यांनी फोनवरून दिल्यानंतर आपण विमानाने मुंबईत पोहोचलो. आल्यानंतर 2 दिवस येथे भगवान इंद्रदेवांची पूजा केली आणि त्यामुळे मुंबईत 11 आणि 12 जुलैला हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतरही पाऊस पडला नाही. त्यासाठी आपले म्हणणे भगवान इंद्रदेवांनी ऐकले असल्याचाही दावा हरिनंदन बाबा यांनी केला.
मुंगेर येथे मागील 3 वर्षांपासून आपण इंद्र देवाची पूजा करून पावसामुळे येणारे संकट रोखले आहे. 3 वर्षांत रोज पूजा याचना करून ही शक्ती मिळवली आहे. मी पुजा केल्यानंतर भगवान इंद्रदेव मला प्रसन्न होतात, आणि हवामान खात्याने कितीही मोठा अंदाज वर्तविला असला तरी पाऊस थांबतो. यासाठी असंख्य लोकांनी माझा हा विश्वास अनुभवला आहे. मात्र, यासाठी मी अजूनही हवामान विभाग आणि इतर यंत्रणेकडे जाऊन पाऊस थांबविण्यासाठीचा दावा आणि त्यासाठीचा पत्रव्यवहार केलेला नसल्याची कबुलीही हरिनंदन बाबा यांनी केली.
बिहारमधील अनेक जिल्हे दुष्काळग्रस्त असताना तिथे पाऊस पडत नाही, त्यावर आपण इंद्रदेवांना विनंती करून पाऊस का पाडत नाही, असा सवाल केला असता हरिनंदन बाबा म्हणाले की, मी जी तपश्चर्या केली त्यात केवळ पाऊस थांबविण्याची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संकटासाठी केली आहे. म्हणूनच मुंबईत 11 जुलैनंतर मुसळधार पाऊस पडला नाही. मी सोमवारी मुंगेरला जाणार असल्याने त्यानंतर मुंबईत काय चित्र असेल हे पहा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, असाही दावा त्यांनी केला. मुंबईत आपण पाऊस थांबविण्यासाठी आलो असून अनेक माध्यमांशी बोलून आपल्या या शोधाची माहिती द्यायची असल्याचेही त्यांनी सांगितले.
हरिनंदन बाबा यांचे मित्र व आशिष योगी यांनीही आपण मुंगेर येथे, असे प्रयोग पाहिले असल्याचा दावा केला. हरिनंदन बाबा यांच्या पूजेत खूप शक्ती असल्याने ते त्यांनी साध्य केले असून त्याला आमच्या बिहारमधील जनतेने मान्य केले आहे. त्यामुळेच मी त्यांना मुंबईत घटना घडल्यानंतर विमानाने बोलावून घेतले होते. 11 आणि 12 तारखेला मुंबईत मोठा पाऊस पडला नाही, हे त्याचे प्रमाण असल्याचे योगी म्हणाले.
यासाठी नेमके कोणती शास्त्रीय कारणे आहेत, यावर माहिती सांगाल काय? असे विचारले असता, हरिनंदन बाबा यांनी आपली पूजा हीच मुख्य असून त्यानंतर इंद्र देव आपले म्हणणे ऐकतात, असा दावा केला. यासाठी आपण कोणत्याही चर्चेला सामोर जाण्याची तयारी ठेवत असल्याचेही त्यांनी सांगितले.