मुंबई - अँटिलिया प्रकरणात आता अनेक खुलासे समोर येत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दबाव वाढताना दिसला होता. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. काल रात्री त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस महासंचालक हेमंत नगराळेदेखील उपस्थित होते. यानंतर आज राज्याच्या गृहखात्याकडून मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तेच दुसरीकडे अँटिलिया प्रकरणांत आजही अनेक घडामोडी घडल्या. याबाबतचा आढावा...
मर्सिडिज कारचा मालक धुळ्याचा -
अँटिलिया बाहेरील स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणाच्या तपासात इनोव्हा कारच्या समावेशानंतर एनआयएने एक मर्सिडीज बेन्झ जप्त केली आहे. ती मर्सिडीज कार(एमएच १८-बी आर-९०९५) निलंबित अधिकारी सचिन वाझे हे वापरत होते. तसेच त्या गाडीचा पूर्वीचा मालक हा धुळे येथील असल्याचे समोर आले आहे. सारांश भावसार असे त्यांचे नाव आहे. मात्र, सारांश यांनी ती मर्सिडीज कार फेब्रुवारी महिन्यात विकली असून थेट वाझे यांना विकली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सचिन वाझेंंना ओळखत नाही -
सचिन वाझे प्रकरणात जी मर्सिडीज कार जप्त केली आहे, त्या गाडीचे पाहिले मालक हे धुळ्यातील आहेत. मात्र याबाबत सारांश भावसार या गाडी मालकाने फेब्रुवारी महिन्यातच ही गाडी एका ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून विकल्याचा दावा केला आहे. मात्र, आपण सचिन वाझे यांना ओळखत नसल्याचेही सारांश यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी अद्याप तपास यंत्रणांकडून किंवा स्थानिक पोलिसांकडून आपल्याला संपर्क करण्यात आलेला नाही. मात्र एनआयएला आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे आश्वासन सारंग भावसार यांनी दिले आहे. गाडी जप्त केल्यानंतर अनेक लोकांनी भावसार यांच्याशी संपर्क साधल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रकरणात तपास यंत्रणाना योग्य ते कागदपत्र सादर करण्याबरोबरच सहकार्य करणार असल्याचेही सारांश यांनी स्पष्ट केले आहे.
पीपीई किटमधील ती व्यक्ती सचिन वाझेच, एनआयएने केले स्पष्ट -
मुकेश अंबानींच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीच्या रात्री पीपीई किटमध्ये दिसलेली व्यक्ती सचिन वाझेच असल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे. जी स्कॉर्पिओ गाडी अँटिलिया इमारतीच्या बाहेर काही अंतरावर पार्क करण्यात आली होती, त्या मागे असलेल्या इनोव्हा कारचा चालक दुसरा कोणी नसून स्वतः सचिन वाझे असल्याचा दावा एनआयएच्या सूत्रांनी केलेला आहे.
वाझेंनी मोबाईलही दिला फेकून -
कुणीही ओळखू नये म्हणून सचिन वाझेंनी मोठ्या रुमालाने तोंड बांधल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. सचिन वाझेंनी पीपीई किट नव्हे तर ओव्हरसाईजचा पायजामा आणि कुर्ता घातलेला होता. आपली देहबोली झाकण्यासाठी त्यांनी असे केल्याचे एनआयएने म्हटले आहे. सचिन वाझेंच्या केबिनमधून एक लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे. मात्र त्यातील डेटा आधीच डीलीट केला होता. सचिन वाझेंना मोबाईल देण्यास सांगितले असला त्यांनी तो कुठेतरी पडल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी तो हेतूपूर्वक कुठेतरी फेकल्याचे एनआयएने म्हटले आहे.
एनआयएची टीम सचिन वाझेंच्या घरी -
एनआयएच्या दोन टीम सचिन वाझे यांच्या घरी पोहोचले असून साकेत कॉम्प्लेक्सच्या आत गाड्या उभ्या आहेत. वाझे कुटुंबियांशी हिरेन प्रकरणात माहिती घेण्याचे काम सुरू आहे. अडीच तासाच्यावर चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे एनआयएची एक टीम सचिन वाझेंना घेऊन निघाली आहे. ही टीम वाझेंच्या घरी जाऊन चौकशी करणार आहे.
हेही वाचा - अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त