मुंबई : पाहायला गेलं तर दादरमधील हा गर्दीचा आणि प्रचंड वर्दळीचा असा परिसर असून हनुमान जयंती दिवशी उद्या मंदिरात हनुमंताच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. मात्र, हनुमंताच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे कुठल्याही वाहतुकीला अडचण येत नाही. जागृत अशा या हनुमान मंदिराविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया....
वटवृक्ष हनुमान मंदिर : पुरातन मंदिर म्हणून दादरच्या कबुतर खान्याजवळ असणाऱ्या हनुमान मंदिराची ओळख आहे. या मंदिरात जुना वटवृक्ष होता. मात्र कालांतराने तो मृत पावला. त्यामुळे या हनुमान मंदिराला पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिर असे नाव दिले गेले आहे. दादर सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी तीन रस्त्यांच्या मधोमधच असलेले हे हनुमान मंदिर पुरातन तर आहेच, मात्र तितकेच प्रसिद्ध देखील आहे.
सर्वधर्मीय प्रतिक : या मंदिराला सर्वधर्मसमभावाचं प्रतिक मानलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक या मंदिरात हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी येतात. दादरमधील प्रसिद्ध असं हे हनुमान मंदिरं आहे. त्या मंदिराचे व्यवस्थापक अरुण वस्त त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, या मंदिराची निर्मिती कशी झाली, याची ठोस माहिती सापडत नाही. मात्र, जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार प्रबोधनकार ठाकरे यांनी या मंदिरात हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. 1920 मध्ये मारुतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. हनुमान जयंती निमित्त हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी पासूनच या मंदिरात सोहळ्याला सुरुवात होते. आदल्या दिवशी सायंकाळी हनुमान चालीसा पठण करून हनुमान जयंतीची सुरुवात होते. भजन कीर्तनाने सुरुवात होऊन सकाळी 6 वाजून 28 मिनिटांनी हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. नंतर दिवसभर हनुमान जयंती दिवशी भक्तांची रेलचेल सुरू असते. या मंदिराच्या समोर मुस्लिम धार्मियांची मस्जिद आहे. मंदिराच्या मागील भागात ख्रिश्चन धर्माच्या लोकांचा क्रॉस आहे. तर मंदिराच्या उजव्या बाजूला जैन धर्मियांचे देरासर हे मंदिर देखील आहे. त्यामुळे या परिसराला सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
दर्शनासाठी मंदिरात गर्दी : गेले अनेक वर्षे भाविक दर्शनासाठी मंदिरात गर्दी करत असतात. शुक्रवार आणि शनिवरी भाविकांची प्रचंड गर्दी करत असते. मंदिरात हनुमंताच्या मूर्तीशिवाय हनुमंताच्या उजवीकडे दत्तगुरूंची मूर्ती तर डावीकडे गणपती, पार्वती आणि शंकराची चांदीची पिंडी देखील आहे. त्याचप्रमाणे गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी या हनुमान मंदिरात शनि देवाची मूर्तीची देखील प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शनिवारी या शनि देवाला आणि हनुमंताला तेल अर्पण केले जाते. या मंदिरात सकाळी आणि संध्याकाळी नित्यनियमाने पूजा केली जाते. हनुमान भक्त गोविंद परब आणि अशोक तुळसुलकर हे म्हणतात की, मागील अनेक वर्षं या मंदिरात येते असून हनुमानावर माझा खूप विश्वास आहे. हे जागृत हनुमान मंदिर आहे. या मंदिरात आल्यानंतर मन शांत आणि समाधानी होतं.