मुंबई- दुबईला जाण्याच्या प्रयत्नात मुंबई विमानतळावर आलेल्या मुनाफ हालारी या आरोपीला अटक करण्यात आली आहे. 2 जानेवारीला गुजरात जवळच्या समुद्र किनारी 5 पाकिस्तानी अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली होती. त्यांचा मुख्य सूत्रधार मुनाफ हालारी होता.
हेही वाचा- विनयभंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना, गार्गी कॉलेजकडून माहिती..
कोण आहे मुनाफ हालारी
1993 साली मुंबईत झालेल्या सिरीयल बॉम्ब ब्लास्ट संदर्भात मुनाफ हालारी मुख्य आरोपी होता. मुनाफ हालारी याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली होती. टायगर मेमन याचा खास हस्तक म्हणून मुनाफ हालारी याची ओळख होती. 1993 च्या ब्लास्टमध्ये मुनाफ हालारी याने स्फोट घडविण्यासाठी 3 दुचाकी घेतल्या होत्या. यातील एक दुचाकी मुनाफ हालारी याने झवेरी बाजार येथे स्फोटक भरून ठेवली होती. 12 मार्च 1993 साली झालेल्या ब्लास्टमध्ये 257 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर 713 जण जखमी झाले होते. यात 27 कोटी मालमत्तेचे नुकसान झाले होते.
गहू, तांदुळाच्या व्यवसायातून पाठवत होता स्फोटक
ब्लास्ट झाल्यानंतर मुनाफ हालारी हा फरार होऊन बँकॉकला पळून गेला होता. टायगर मेमन याच्या मदतीने मुनाफ हालारीचा पाकिस्तानी पासपोर्ट बनविण्यात आला होता. पाकिस्तानी पासपोर्ट नंबर बीएम 1799983 हा अन्वर मोहम्मद या नावाने बनविण्यात आला होता. पाकिस्तानी पासपोर्टच्या आधारावर मुनाफ हा बरीच वर्षे नैरोबी केनिया या ठिकाणी पाकिस्तानी नागरिक म्हणून राहत होता. याठिकाणी तो मॅगनम आफ्रिका या नावाने व्यवसाय करू लागला होता. मात्र, काही वर्षानंतर त्याने टायगर मेमन याच्या इशाऱ्यावरून गहू, तांदुळाचा आयात निर्यातीचा व्यवसाय करू लागला होता. या व्यवसायाच्या माध्यमातून मुनाफ याने भारतात स्फोटक पाठविण्याचाही प्रयत्न केला होता.
1993 ब्लास्टनंतर मुनाफ हालारी 2 वेळा आला होता भारतात
2 जानेवारी 2020 रोजी पकडण्यात आलेल्या 5 पाकिस्तानी तस्करांच्या चौकशीत पकडण्यात आलेले अमली पदार्थ हे पाकिस्तानातील हाजी हसन याच्याकडून मिळाले होते. हाजी हसन व मुनाफ हालारी हे दोघेही या अमली पदार्थाच्या तस्करीसाठी मोबाईल फोनवर एकमेकांशी संपर्कात होते. 1993 च्या ब्लास्टनंतर मुनाफ हालारी हा 2014 नंतर 2 वेळा भारतात पाकिस्तानी पासपोर्टवर येऊन गेला आहे. अटारी बॉर्डरच्या माध्यमातून मुंबईत त्याने 2 वेळा भेट दिली आहे. गुजरात एटीएस पोलिसांनी मुनाफ हालारी याला अटक करून त्याच्याजवळील पाकिस्तानी पासपोर्ट जप्त केला आहे.