मुंबई - भाजप प्रदेश कार्यालय येथे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या रथाला माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ भाजप नेते राम नाईक, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला. या यात्रेत वापरण्यात येणारे रथ हे आमच्यासाठी लाभदायी ठरले आहेत, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची १ तारखेपासून जनादेश यात्रा निघणार आहे. तर या यात्रेत वापरण्यात येणाऱ्या रथाला आज हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यात्रेत वापरण्यात येणारे रथ हे भारतीय जनता पक्षासाठी लाभदायी ठरत आहेत. यातील एक रथ अमित शहा यांनी त्यांच्या जनसंपर्क यात्रेत वापरलेला यशस्वी रथ आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
राम नाईक यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या सभासद अर्ज भरून सक्रिय राजकारणात पुन्हा प्रवेश केला. राज्यपाल असताना कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवायचा नसतो. परंतु, आता त्यांचा कार्यकाळ संपला असता ते आज पुन्हा भाजपचे सभासद झाले आहेत.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथून १ ते ९ ऑगस्ट दरम्यान यात्रेचा पहिला टप्पा होणार असून या भागातील एकूण १४ जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टला सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा १८ जिल्ह्यातल्या ९३ विधानसभा मतदारसंघात २ हजार ७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून ४ हजार ३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे. दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ८७ मोठ्या सभा, ५७ स्वागत सभा होणार आहेत.