मुंबई - महानगरक्षेत्रात यंदा नवीन खासगी 35 कनिष्ठ महाविद्यालयांची भर पडली असून त्यामुळे अनुदानित महाविद्यालयांतील रिक्त राहणाऱ्या जागांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील वर्षी तब्बल 70 हजारापर्यंत जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा 35 महाविद्यालये वाढली असल्याने त्यात मोठी भर पडेल आणि त्याचा फटका हा केवळ अनुदानित महाविद्यालयांना बसेल, अशी भीती शिक्षक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी मुंबई महानगरक्षेत्रात येणाऱ्या मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, अंबरनाथ नगरपालिका तसेच पनवेल परिसरात 814 कनिष्ठ महाविद्यालये होती. तर एकूण प्रवेशासाठी 3 लाख 17 हजार 60 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी 70 हजारांच्या दरम्यान जागा प्रवेशाविना रिकाम्या राहिल्या होत्या. त्याच शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राबवलेल्या धोरणामुळे मुंबई महानगरक्षेत्रात 35 नवीन महाविद्यालयांची भर पडली असल्याने, यंदा या जागांमध्ये 5 हजार 200 जागांची वाढ होणार असून याचा सर्वात मोठा फटका हा अनुदानित महाविद्यालयांना बसेल, अशी भीती कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटचे सचिव प्रा. अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मुंबईत ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. त्यातील 7 महाविद्यालये ही एका श्रीमंत क्लासेसवाल्यांची असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सर्व नियम धाब्यावर बसवून ही परवानगी दिली असल्यानेच, अनुदानित कनिष्ठ महाविद्यालये ही अडचणी सापडली जाणार असल्याचेही प्रा. देशमुख यांनी सांगितले. मुंबई महानगरक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये लवकरच अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरूवात होत आहे. नुकतेच त्यासाठी महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
या ठिकाणी वाढल्या जागा -
- ठाणे महापालिका क्षेत्र - 3 हजार 600 जागा
- मुंबई महापालिका क्षेत्र - 1 हजार 520
- पनवेल महापालिका क्षेत्र- केवळ 80
शाखानिहाय उपलब्ध जागा -
- कला - 36 हजार 360
- वाणिज्य - 1 लाख 67 हजार 330
- विज्ञान - 96 हजार 930