मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प मंगळवारी विधी मंडळात सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आश्वासनांची खैरात करण्यात आली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१९-२० चा सादर केलेला अर्थसंकल्प एकूण ४ लाख ४५ हजार ३६ कोटींचा आहे. तर यात २० हजार २९२ कोटींची महसुली तूट आहे. तर राज्यावर ४ लाख ११ हजार कोटींचे कर्ज असून अर्थसंकल्पातील तरतुदी पूर्ण केल्यास हे कर्ज ४ लाख ७१ हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी २७ फेब्रुवारी रोजी अंतरीम अर्थसंकल्प जाहीर केला. त्यांनतर मंगळवारी विधानसभा निवडणुकीच्या आधी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला असून यात सर्व घटकांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः समाजिक न्यायाच्या दृष्टीने धनगर आणि इतर मागासवर्गीयांच्या योजनांवर १२ हजार ३०३ कोटी ९४ लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. इतर मागासवर्ग लाभार्थ्यांसाठी असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळास २०० कोटी एवढा निधी उपलब्ध झाला आहे.
इतर मागास प्रवर्गातील मुलांसाठी १८ आणि मुलींसाठी १८ अशी एकून ३६ वसतीगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी अर्थमंत्र्यांनी २०० कोटी रुपयांची तरतूद यावर्षी केली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीत शिकणाऱ्या इतर मागासवर्गातील मुलींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृत्ती प्रित्यर्थ शिष्यवृत्ती योजनाही लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दहावी बारावीत इतर मागासवर्गातून राज्यात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला वसंतराव नाईक पुरस्काराने गौरवण्यात येणार असून त्या विद्यार्थ्याला १ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केला.
धनगर समाजाला आश्वासन देऊनही या सरकारच्या काळात आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे धनगर समाजाची नाराजी दूर करण्यासाठी या अर्थसंकल्पात समाजासाठी १ हजार कोटींचा विशेष निधी उपलब्ध करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष कार्यक्रमांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेनंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात ६०० रुपयांवरून घसघशीत १००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचबरीबर आदिवासी विकास विभागासाठी १० हजार ७०५ कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
विविध ठिकाणी स्मारके बांधण्याचीही घोषणा
१) क्रांतीकारक खाजाजी नाईक - जळगाव
२) जेष्ठ रंगकर्मी मच्छिद्र कांबळी- कुडाळ
३) शिवरामराजे भोसले - सावंतवाडी
४) वीर भावोजी नाईक - नांदूर, नाशिक
५) वीर नाग्या कातकरी - रायगड, चिरनेर
६) वीर बाबुराव शेडमाके - घोट, गडचिरोली
७) सर सेनापती वीर बाजी पासलकर- पानशेत, पुणे
या शिवाय जंगल सत्याग्रहात वीर मरण आलेल्या जनजाती वीरांचे स्मारक जनकापूर नाशिक येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी ५० कोटी खर्च राखीव ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारे विधानसभा निवडणुकीच्या आधी सामाजिक घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.