मुंबई Chief Minister My School campaign : अलीकडच्या काळात सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीनंतरही मुले जागी राहतात. परंतु शाळेसाठी त्यांना लवकर उठावे लागते. त्यामुळं त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप चांगली व्हावी, या दृष्टीने शाळेच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली आहे. मुलांच्या दप्तराचा भार हलका करण्यासाठी 'पुस्तक-विहीन शाळा, ई-वर्ग यांना चालना द्यावी. मंगळवारी शालेय शिक्षण विभागाच्या सहा प्रोत्साहनात्मक योजनांचा राजभवन येथे शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
नवीन शालेय इमारतीचे केले लोकार्पण : यावेळी 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा', (Chief Minister My School, Beautiful School Campaign) 'गोष्टींचा शनिवार', 'आनंददायी वाचन', 'दत्तक शाळा उपक्रम', 'माझी शाळा माझी परसबाग', 'स्वच्छता मॉनिटर - २' आणि मुंबई महानगर पालिकेच्या नवीन शालेय इमारतीचे लोकार्पण आदी योजनांचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha), शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सुरज मांढरे उपस्थित होते.
ग्रंथालयास नवसंजीवनी देणे आवश्यक : राज्यात शेकडो सार्वजनिक ग्रंथालयं आहेत. मात्र आज ही ग्रंथालयं ओस पडली आहेत. अधिकतर पुस्तकं जुनी किंवा कालबाह्य झाली आहेत. सर्व वाचनालयांना इंटरनेट, कम्प्यूटर सुविधा देऊन नवसंजीवनी देणे आवश्यक आहे. यासाठी ग्रंथालय दत्तक योजना देखील चालू केली पाहिजे. तसंच ग्रंथालयांचा कायापालट केला पाहिजे. आजकाल विद्यार्थी केवळ पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञान ग्रहण करीत नसून ते इंटरनेट, विभिन्न स्रोतांमधून ज्ञान मिळवत आहेत. मुलांचा बुद्ध्यांक वाढत असून शिक्षकांनी अध्ययनाच्या बाबतीत अद्ययावत राहिलं पाहिजे.
सायबर गुन्ह्यांपासून मुलांचं रक्षण व्हावं : इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हाती केवळ सुरक्षित सामग्री पोहोचावी या दृष्टीने पालक आणि शिक्षकांनी जागरूक राहिलं पाहिजे. सायबर गुन्ह्यांपासून मुलांचं रक्षण व्हावं यासाठी शाळांमध्ये व्याख्याने आणि सत्रांचं आयोजन करण्यात यावं. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व्हावं या दृष्टीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ कमी द्यावा तसंच खेळ आणि इतर कृतिशील उपक्रमांवर भर द्यावा असं राज्यपालांनी सांगितलं.
आदर्श शाळा पाहिजे : गावांमध्ये एकवेळ मंदिर, मस्जिद अथवा चर्च नसलं तरीही चालेल. परंतु आदर्श शाळा असावी. राज्य शासन शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य देत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राज्याच्या कानाकोपऱ्यात संस्कार देणाऱ्या आदर्श शाळा निर्माण झाल्या पाहिजेत. उद्योगपती मुकेश अंबानी हे स्वतः शाळांच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी गुंतवणूक करण्यास तयार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 'शासन आपल्या दारी' या उपक्रमातून शासन लाखो लोकांपर्यंत पोहोचत असल्याचं त्यांनी सांगितलं. 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' तसंच मुंबईतील शाळांना कौशल्य शिक्षणाशी जोडण्याच्या योजनेबाबत आपण व्यक्तिशः लक्ष घालू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यात सेलिब्रिटी स्कूल्स सुरू करणार : यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात संगीत, नाटक, वक्तृत्व आदी शिक्षण देणाऱ्या 'सेलिब्रिटी शाळा निर्माण करणार असल्याचं सांगितलं. शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकचं राज्य व्हावं या दृष्टीने विविध शालेय उपक्रमांचे उद्घाटन करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील शाळांमध्ये सोयी सुविधा वाढवणे. शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे. विद्यार्थ्यांच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे. आरोग्य, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे, यासाठी शालेय उपक्रमांची सुरुवात आली. या अभियानासोबत दत्तक शाळा योजना, महत्वाचं उत्सव, माझी शाळा माझी परसबाग, स्वच्छता मॉनिटर टप्पा-२ या योजनांचा देखील शुभारंभ करण्यात आला.
हेही वाचा -