मुंबई - मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनातील १०५ हुतात्म्यांना आज(गुरुवार) फ्लोरा फाऊंटन हुतात्मा स्मारक येथे आदरांजली देण्यात आली. या स्मृतीदिनानिमित्ताने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच इतर मान्यवरांनी येथे पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले.
![हुतात्म्यांना राज्यपालांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आदरांजली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5130227_mum.jpg)
१९५५ च्या सुमारास मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची मागणी जोर धरू लागली होती. अशा काळात २० नोव्हेंबर १९५५ ला काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते मोरारजी देसाई आणि स. का. पाटील यांनी चौपाटीवर सभा घेऊन, मराठी भाषकांच्या विरोधात प्रक्षोभक भाषणे केली. त्यामुळे संतप्त लोकांनी काँग्रेसची सभा उधळून लावली. २१ नोव्हेंबर १९५५ ला झालेल्या आंदोलनातील पोलीस गोळीबारात १५ लोकांना वीरमरण आले. या घटनेनंतरही तत्कालीन सरकारची भूमिका जनविरोधी होती.
हेही वाचा - राज्यातील प्रश्नांबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची घेतली भेट
जानेवारी १९५६ च्या सुमारास केंद्रशासित मुंबईची घोषणा झाल्यानंतर लोकांनी रस्त्यावर उतरून सत्याग्रह, मोर्चा, हरताळ अशी आंदोलने संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आवाहनानुसार सुरू केली. त्यावेळी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी मोरारजी सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून केलेल्या निष्ठुर गोळीबारात आणखी ८० लोकांना वीरमरण आले. अशा पद्धतीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या हुत्मात्म्यांच्या स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन येथे हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाच्या ठिकाणी दरवर्षी राज्यपालांस इतर मान्यवर येऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहतात.
हेही वाचा - म्हाडाच्या घरांची लॉटरी डिसेंबरच्या अखेर निघणार, ६ हजारांपेक्षा जास्त घरे उपलब्ध
हुतात्म्यांना आदरांजली देण्याचा प्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, राज्याचे मुख्य सचिव, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, पोलीस महासंचालक एसके जयस्वाल, कोकण विभागाचे महसूल आयुक्त डॉ. जगदीश पाटील, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनीही यावेळी पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले.
हेही वाचा - पालिका रुग्णालयाच्या सीईओपदी डेप्युटी डीनची वर्णी, प्रिन्स प्रकरणानंत पालिकेचा निर्णय