मुंबई - राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम परीक्षा न घेण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) पत्र लिहिले. त्यात राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. याप्रकरणावर राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती भगतसिंग कोश्यारी संतापले आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मंत्र्यांनी परीक्षा प्रकरणात लुडबूड करू नये, असे म्हटले आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी 17 मे रोजी यूजीसीला पत्र पाठवून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा घेण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभाग असमर्थ आहे. त्यामुळे आपण या परीक्षा रद्द करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. उदय सामंतांनी याप्रकरणात लुडबूड करू नये असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत, अशी खरमरीत सूचना राज्यपालांनी केली आहे. सामंत यांची ही लुडबूड यूजीसीच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहेच, त्याचबरोबर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६च्या तरतुदींचे उल्लंघन करणारीह आहे, असे कोश्यारी यांनी म्हटले आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेणे हे यूजीसीच्या नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यापीठांचे हित लक्षात घेऊन विलंब न करता मुख्यमंत्र्यांनी हा विषय मार्गी लावावा, असे निर्देश राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणावर आणि नोकऱ्यांवर होईल, अशी चिंता राज्यपालांनी व्यक्त केली आहे.
राज्यपालांनी पाठवलेल्या पत्राबाबत उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोविडची सद्यस्थिती पाहता आम्ही विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनतून विचार करून मत मांडले आहे. याअगोदरच्या परीक्षा रद्द करताना मी राज्यपालांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही असाच निर्णय आम्ही घेणार आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे.