मुंबई - वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्याचा 13 अकृषी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्याची घोषणा नुकतेच उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली होती. यानंतर आज (दि. 24 एप्रिल) उदय सामंत यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत याबाबात माहिती दिली. त्यानंतर राज्यपालांनीही विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेला संमती दाखवली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य शासनांकडून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे इतर व्यवहारांप्रमाणेच परीक्षांचे नियोजनही विस्कळीत होण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्यातील 13 अकृषी विद्यापीठाचा कुलगुरूंशी 'उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत गुरुवारी एक महत्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कोरोना संसर्ग काळात अंतिम वर्षाच्या आणि अन्य परीक्षांचा आढावा घेण्यात आलेला होता. त्यानंतर उदय सामंत यांनी परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. गोंडवाना विद्यापीठात ऑनलाइन परीक्षा कशी घेणार हा प्रश्न होता. मात्र, सर्वातआधी त्यांनीच यशस्वीपणे ऑनलाइन परीक्षा घेतली.
तसेच सुरू असलेल्या ऑनलाइन परीक्षेतील विद्यार्थांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तेराही विद्यापीठाच्या कुलगुरूंना सूचना दिल्या आहे. तसेच विद्यार्थांना नुकसान होणार नाही याची काळजी विद्यापीठ आणि महाविद्यालय घेतील, असेही संगण्यात आले. या परीक्षांमधून कोणतेही विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, याची दक्षता या विद्यापीठांनी घेणार असल्याचेही मंत्री सामंत यांनी राज्यपालांना सांगितले.
हेही वाचा - निवासी डॉक्टरही दुसऱ्या लाटेच्या 'कचाट्यात'; दोन महिन्यात राज्यभरातील 463 डॉक्टर पॉझिटिव्ह