मुंबई - उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार व भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी यंदा ४ लाख ५३ हजार मतांची आघाडी घेत स्वतःचा रेकॉर्ड ब्रेक केला. २०१४ मध्ये गोपाळ शेट्टी यांनी ४ लाख ४६ हजार ५८२ मतांची आघाडी घेतली होती. गोपाळ शेट्टी यांनी मोठया संख्येने आघाडी मिळवत उत्तर मुंबई लोकसभेची शान कायम राखली. उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्रात गोपाळ शेट्टी यांना ६ लाख ८८ हजार ६३८ तर उर्मिला मातोंडकर यांना २ लाख ३५ हजार ६२२ मते मिळाली.
भाजपचा पारंपरिक गड समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबईत राम नाईक यांना अभिनेते गोविंदा यांनी आश्चर्यकारकरित्या हरवले होते. त्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी या मतदारसंघात आपली पकड मजबूत केली असे दिसताच काँग्रेसने आपला पत्ता बाहेर काढत मराठी मुलगी व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना त्यांच्या विरोधात निवडणूकीच्या रिंगणात उभे केले. अभिनय क्षेत्रातील कामगिरी मराठी इंग्रजी व हिंदीवर प्रभुत्व असणाऱ्या मातोंडकर यांनी अल्पावधीतच उत्तर मुंबईत प्रचाराचा धडाका सुरू केल्यानंतर गोपाळ शेट्टी यांच्या पायाची जमीनही सरकली होती. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजप विरोधात वातावरण उभे करत मराठी मतांना फुंकर घातली होती. ही फुंकर विस्तव रूपाने भाजपला त्रास देईल असे वाटत होते. परंतु त्यांचाही करिष्मा मुंबई व महाराष्ट्रातील कोणत्याही जागेवर दिसून आला नाही.
काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची प्रचार नीती व घाम गाळून काम करण्याची प्रवृत्ती नसल्याने मातोंडकर यांना पराभव पत्करावा लागलं. २००४ साली गोविंदाला उत्तर मुंबईच्या जनतेने निवडून दिले होते, मात्र त्याने मतदारसंघात काम न केल्याचा अनुभव आल्यामुळे उर्मिला यांना उत्तर मुंबईच्या मतदारांनी नाकारले. मात्र प्रत्यक्षात गोपाळ शेट्टी यांना मिळालेल्या मतावरून मतदारांनी शेट्टी यांच्या कामाला मतदान केल्याचे चित्र उत्तर मुंबईत दिसून आले. उर्मिला यांना काँग्रेसची पारंपरिक मते पदरी पडली.
निवडणूक काळात उर्मिला यांच्या मतदारसंघात होत असलेल्या भेटी गाठीने उर्मिला गोपाळ शेट्टी यांची मतांची लीड तोडणार असे चित्र होते, मात्र प्रत्यक्षात उर्मिला यात कमी पडल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या सुरुवातीपासून गोपाळ शेट्टींनी आघाडी घेतली ती शेवटच्या मतमोजणी पर्यंत कायम राखली.