मुंबई - म्हाडाकडून लवकरच 'एमएमआरडीए'च्या भाडेतत्त्वावरील तीन हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसाठी ही एक खुशखबर आहे. ही घरं 'एमएमआरडीएक'डून म्हाडाला मिळणार आहेत, यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. घरे ताब्यात आल्यानंतर तीन हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळ म्हाडाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली आहे.
पावणेदोन लाख कामगारांकडून घरासाठी अर्ज
मुंबईतील बंद गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना मोफत घरे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गिरण्यांच्या जागा ताब्यात घेत त्यावर घरे बांधण्याची आणि ती वितरित करण्याची जबाबदारी म्हाडावर सोपवण्यात आली आहे. या घरांसाठी सरकारने गिरणी कामगारांकडून अर्ज मागवले आहेत. बँकांच्या माध्यमातून मागवण्यात आलेल्या या अर्ज प्रक्रियेला कामगारांनी चांगला प्रतिसाद दिला. आत्तापर्यंत दीड लाख कामगारांनी अर्ज केले. दरम्यान, काही कामगार अर्ज करू न शकल्याने ते या लाभापासून दूर राहत होते. त्यामुळे अशा कामगारांना एक संधी द्यावी अशी मागणी होत होती. ही मागणी अखेर सरकारने मान्य केली आहे. त्यानुसार कामगारांना एक संधी देण्यात आली. या दुसऱ्या टप्प्यात २५ हजार कामगारांनी अर्ज सादर केले. एकूण म्हाडाकडे घरासाठी पावणे दोन लाख कामगारांनी घरासाठी अर्ज केले आहेत. आता या पावणेदोन लाख गिरणी कामगारांना घरे देण्याचे आव्हान सरकारसमोर आहे.
आतापर्यंत १५ हजार ८७० घरांची लॉटरी
गिरण्यांच्या जमिनीवरील घरासाठी म्हाडाकडे पावणेदोन लाख अर्ज आले आहेत. पण आतापर्यंत यातील जेमतेम १५ हजार ८७० कामगारांचेच घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. म्हाडाला आतापर्यंत १५ हजार ८७० इतकीच घरे लॉटरीसाठी उपलब्ध झाली आहेत. ज्या गिरण्यांकडून म्हाडाला जागा मिळाल्या त्यावर म्हाडाने घरे बांधली. मात्र, हा आकडा खूपच कमी आहे. त्यामुळे कामगारांना घरे देण्यासाठी वेगळा पर्याय म्हणून सरकारने 'एमएमआरडीए'च्या भाडेतत्त्वावरील प्रकल्पातील ५० टक्के घरे देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आतापर्यंत काही हजार घरे म्हाडाला लॉटरीसाठी उपलब्ध झाली होती. दरम्यान, आतापर्यंत गिरण्याच्या जमिनीवरील आणि 'एमएमआरडीए'च्या घरांची मिळून चार लॉटऱ्या काढण्यात आल्या आहेत. या चार लॉटरीमध्ये आतापर्यंत १५ हजार ८७० घर निघाली आहेत.
पनवेलमधील घरे लवकरच मिळणार
'एमएमआरडीए'ने याआधी काही हजार घरे म्हाडाला दिली होती. तर आता लवकरच आणखी तीन हजार घरे 'एमएमआरडीए'कडून मिळणार आहेत. ही घरे कोन पनवेलमधील असून, घरे लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्यानुसार येत्या काही महिन्यांत या घरांसाठी लॉटरी निघेल असेही म्हसे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - राजीव सातव यांच्या मृत्यूची उच्चस्तरिय चौकशी करा; नांदेड जिल्ह्यातून राष्ट्रपतींकडे मागणी
हेही वाचा - माजी पंतप्रधान राजीव गांधींची 30वी पुण्यतिथी; राहुल आणि प्रियंका गांधींनी वाहिली श्रद्धांजली