मुंबई - बॉलीवूडच्या हिंदी चित्रपटांमध्ये 'कानून के हाथ लंबे होते है' असा डायलॉग नेहमीच मारला जातो. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हा डायलॉग खरा करून दाखवला आहे. सात वर्षांपूर्वी मुंबई एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यवसायिकाच्या घरात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. दीन मोहम्मद उर्फ संजय शर्मा असे या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा - प्लास्टिक बंदी कारवाई अंतर्गत ठाण्यात ५.७ टन प्लास्टिक जप्त; २ लाखाचा दंड वसूल
सात वर्षांपूर्वी एका व्यवसायिकाच्या घरात 68 लाख रुपयांचे सोने आणि रोख रकमेची चोरी झाली होती. या चोरीच्या घटनेचा तपास 2015मध्ये थांबवण्यात आला होता. आता सात वर्षांनंतर या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराची सात वर्षांपूर्वी मुंबईतील गोवंडी परिसरात हात गाडी चालवणाऱ्या दीन मोहम्मद सोबत ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर तक्रारदाराने दिन मोहम्मद याला स्वतःकडे कामासाठी ठेवून घेतले. तक्रारदाराच्या पत्नीने दिन मोहम्मद यास त्यांच्या अंधेरी परिसरातील फ्लॅटमधून कुराण आणण्यासाठी पाठवले होते. दीन मोहम्मद तक्रारदाराच्या घरी कुराण आणण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेली रोख रक्कम, सोने-चांदी असा 68 लाख रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेला.
मूळचा बिहारचा असलेला दीन मोहम्मद याने मथुरा येथे आल्यानंतर स्वतःचे नाव बदलून बनावट कागदपत्रांच्या आधारावर संदीप शर्मा हे नाव धारण केले. मात्र, गेली सात वर्षे चोरी केलेले सोने-चांदीचे दागिने विकण्यासाठी अधून-मधून तो मुंबईतील जव्हेरी बाजारामध्ये येत होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास लागत नसल्यामुळे गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग करण्यात आलेला होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुंबईतील जव्हेरी बाजारातून दीन मोहम्मद उर्फ संजय शर्मा या आरोपीला अटक करण्यात आली आहे.