मुंबई Gold seized at Mumbai Airport : मुंबई एअर इंटेलिजन्स युनिटनं रविवारी एका परदेशी महिलेला मुंबई विमानतळावरून अटक केली. तिच्याकडून ३.४० किलो सोनं जप्त करण्यात आलंय. या सोन्याची किंमत तब्बल १.६३ कोटी रुपये आहे. या महिलेनं तिच्या कपड्यात सोनं लपवलं होतं. तर काही सोन्याचे दागिने तिनं अंगावर घातले होते. तिला कोर्टात हजर केलं असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
१.६३ कोटी रुपये किमतीचं सोनं जप्त : मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतल्यानंतर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी महिलेच्या सामानाची तपासणी केली. त्यांनी तिच्या आतल्या कपड्यांमध्ये लपवून ठेवलेले २२ कॅरेट सोन्याचे वितळलेले १७ तुकडे आणि तिच्या शरीरावरील २१ कॅरेट सोन्याचे विविध दागिने जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या सोन्याचे एकूण वजन ३.४ किलो असून त्याची किंमत १.६३ कोटी रुपये आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी महिलेचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलंय.
महिला केनियाची रहिवासी आहे : सहारा मोहम्मद उमर असं या आरोपी महिलेचं नाव आहे. ती केनियाची राजधानी नैरोबीची रहिवासी आहे. ती ३० सप्टेंबर रोजी केनिया एअरवेजच्या एका विमानातून मुंबईला आली होती. तपासादरम्यान अधिकाऱ्यांना या महिलेकडे ब्रिटनचा पासपोर्टही आढळला. कस्टम अधिकाऱ्यांनुसार, ही महिला यापूर्वीही सोन्याच्या तस्करीत गुंतली असल्याची शक्यता आहे. तपासणीनंतर महिलेला सीमाशुल्क कायद्याच्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली. न्यायालयानं तिला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे. या संपूर्ण ऑपरेशन्सचा पर्दाफाश करण्यासाठी तसेच रॅकेटचा मास्टरमाईंड ओळखण्यासाठी पुढील तपास सुरू करण्यात आल्याचं कस्टम अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं.
हेही वाचा :