मुंबई : वसई रोड रेल्वेच्या हद्दीतील प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. वसई रोड रेल्वे पोलिसांनी यातील एका प्रकरणाचा तपास करताना सीसीटीव्ही तपासले होते. त्यावेळी त्यांना एक संशयित इसम दिसला; पण त्याने ओळख पटू नये यासाठी चेहर्यावर मास्क लावला होता तसेच टोपी घातली होता. प्रत्येक गुन्ह्यात तो वेगवेगळ्या प्रकारचे टिशर्ट, मास्क आणि टोपी वापरत होता. परिणामी, लबाड चोराला पकडणे पोलिसांपुढे आव्हान होते.
अशी लढविली शक्कल: पोलिसांनी दोनशेहून अधिक सीसीटीव्ही तपासून त्याच्या देहबोलीचे निरीक्षण केले आणि नालासोपारा येथे सलग तीन दिवस सापळा लावला. त्यावेळी मोहम्मद अमन हुसेन (वय ३० वर्षे) या आरोपीला अटक केली. चौकशीत त्याने वसई रोड येथे दोन तसेच बोरीवली रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील केलेले ६ गुन्हे उघडकीस आले. दरम्यान चोरट्याकडून गुन्ह्यातील ४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपी मास्क लावून चेहरा झाकत होता; परंतु आमच्या पथकाने कौशल्याने तपास करून आरोपीला अटक केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त (पश्चिम रेल्वे) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.
आरोपी हा रिक्षाचालक: आरोपीच्या नावावर यापूर्वी कुठल्याच गुन्ह्याची नोंद नाही. तो पूर्वी रिक्षा चालवत होता. नुकताच तो गावावरून नालासोपारा येथे राहण्यासाठी आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्ष एन.डी. पडवळ आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तांत्रिक पद्धतीने चोराला अटक: रेल्वे पोलिसांनी यापूर्वीही तांत्रिक पद्धतीने तपास करून चोरांना अटक केली आहे. अशीच एक घटना दादर रेल्वे स्टेशनवर 1 मे, 2022 रोजी घडली होती. रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या दादर फलाट 3 वर विरार-चर्चगेट लोकल आली असता, लोकलमध्ये बसलेल्या प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने गळातून खेचून चोराने पळ काढला. प्रवाशाने यासंदर्भात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चोराचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोराचा मागोवा घेण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून पाच दिवसात चोराला अटक केली.
पोलिसांची डोकेदुखी वाढली: मुंबई आणि उपनगरील वाढत्या लोकसंख्येमुळे रेल्वेचा उपनगरी रेल्वे प्रवास अत्यंत जिकरीचा झाला आहे. काही वर्षांत लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लोकलच्या डब्यातील प्रवास म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे. या गर्दीचा फायदा घेईन मोबाईल, मौल्यवान वस्तूची चोरी होण्याची प्रकरणे वाढली आहे. त्यामुळे पोलिसांची सुद्धा डोकेदुखीत वाढ झाली आहे. या चोरट्यांना आळा घालण्यासाठी रेल्वे स्थानकांवर पोलीस गस्त वाढविण्यात येत आहेत.