मुंबई - राज्यातील जनतेची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला मंत्रालयात पोहोचायचे आहे, अशी कबूली युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दहिसर येथील एका कार्यक्रमात दिली. तर आदित्य हे शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
दहिसरचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या सहकार्याने तारामती चॅरिटेबल ट्रस्टच्या शिवम हॉस्पिटलमध्ये नव्या डायलिसिस केंद्राचे सोमवारी रात्री आदित्य यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
शिवसेना देशभरातल्या लोकांना महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य सेवा देत आहे. देशभरातील लोक महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असतात. हे केवळ शिवसेनाच करु शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पीक विम्यासाठी शिवसेनेने काढलेल्या मोर्चानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रचारासाठी शिवसेनेला काम करण्याची आवश्यकता वाटत नाही. शिवसेना सदैव जनतेसाठी काम करत राहणार आहे. तसेच जनतेला शिवसेनकडून मोठ्या आशा-आकांशा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी मंत्रालयात जायचे असल्याचे आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
आदित्य शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. मात्र, याला शिवसेना पक्षप्रमुखांकडून अद्याप स्पष्ट दुजोरा देण्यात आला नाही. मात्र, आदित्य यांच्या भाषणात याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप यांची युती झाल्याचे दोन्ही पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे. मात्र, अद्याप जागावाटपा बाबत ठोस भूमिका मांडण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाला तर सेनेकडून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येईल, अशी शिवसेनेच्या गोटात चर्चा आहे.
राज्याच्या राजकारणात ठाकरे कुटुंबियांपैकी अद्याप कुणीही थेट निवडणूक लढवून लोकशाहीच्या सभागृहात पोहोचले नाही. मात्र, आदित्य ठाकरे आगामी निवडणूक लढवतील याचेही स्पष्ट संकेत आता मिळत आहेत.