मुंबई Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विलेपार्लेतील लोकमान्य सेवा संघानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. गडकरी यांना कार्यक्रमात जातीनिहाय जनगणना समाजासाठी महत्त्वाची आहे की, राजकारणाचा भाग आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, माणसाचं मोठेपण कधीच त्याची जात, पंथ, धर्म, भाषा यांच्याशी निगडीत नसते. तसंच, मी कधीही सांप्रदायिक कार्यक्रमांना जात नाही.
माणसाच्या कामाचा जातीशी संबंध नसतो : जॉर्ज फर्नांडिस यांच्यापासून अनेक दिग्गज नेते मी पाहिले आहेत. पण माणसाच्या कामगिरीचा त्यांच्या जातीशी कधीच संबंध नसतो. मी यूपी-बिहारला जातो, तिथं ज्याप्रमाणे ब्राह्मणांना प्राधान्य मिळतं, तसंच प्राधान्य महाराष्ट्रात मराठ्यांना मिळतं. मिश्रा, दुबे, तिवारी यांनी तिथं राज्य केलं. एकदा मी वाराणसीला गेलो होतो, तेव्हा तिथं पंडित नितीन गडकरी आले, पंडित नितीन गडकरी आले, अशी घोषणाबाजी करण्यात आली. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, हे मला आवडत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की, पंडित अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर आमच्या मनात फक्त पंडित नितीन गडकरी यांचं नाव येतं. मात्र, मागासलेपणा हा राजकारणाचा कमजोरपणा आहे, असंही गडकरी म्हणाले.
हे किती दिवस चालणार? : गडकरी पुढे म्हणाले की, राजकारणात लोकांनी जात, पंथ धर्माच्या विरोधात नागरिकांनी मान्यता दिली आहे. आंबेडकर दलित समाजाचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजाचे, महात्मा फुले माळी समाजाचे, असं किती दिवस चालणार. त्यामुळं या समाजातील अस्पृश्यता, जातिवाद नष्ट झाला पाहिजे. माणूस जातीनं किंवा गुणांनी श्रेष्ठ असावा. मी जात, वर्ण, धर्म पाळणार नाही, हे प्रत्येकानं ठरवावं. सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. जे सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांनी समाजासोबत एकत्र येऊन विषमता दूर केली पाहिजे.
धर्माचा संबंध हा कर्तव्याशी असतो : सत्ताकारण म्हणजे राजकारण नाही. समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण महत्त्वाचं आहे. विक्रमादित्याच्या काळापासून राजा नाही, तर धर्म श्रेष्ठ आहे. धर्म म्हणजे पूजा करणारा धर्म नाही आहे. धर्माचा संबंध हा कर्तव्याशी असतो. सेवेचं राजकारण करायला हवं. विदर्भात आतापर्यंत दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पण एक दिवस असा येईल, की विदर्भात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. गेली नऊ-दहा वर्षे मी यासाठी प्रयत्नशील आहे. मी फक्त समाजकार्य करायचं ठरवलं आहे. राजकारण हे एक सामाजिक कारण आहे. तुम्ही जे पाहता ते सत्ताकारण आहे. तसंच संघर्ष आणि संवाद हा जीवनाचा भाग आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचं एक सुंदर वाक्य आहे, "मतभेद असले पाहिजेत पण मनभेद नसावेत." असेही गडकरी म्हणाले.
हेही वाचा -