मुंबई - कोरोनाच्या युद्धजन्य परिस्थितीत अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी 'बेस्ट' सेवा देत होती. मात्र, आता कोरोनाबाधित रुग्णांना वाहून नेण्यासाठीही बेस्टचा वापर केला जातोय. जे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने बेस्ट कर्मचाऱ्यांची आरोग्याची जबाबदारी घ्यावी. तसेच त्यांना 1 कोटी रुपयांचा विमा सुरक्षा कवच देण्यात यावे, अशी मागणी बेस्ट एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नितिन भाऊराव पाटील यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांकडे पत्राद्वारे केली आहे.
कोरोनाने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे, हे माहीत असूनही बेस्ट प्रशासन आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेताना दिसत नसल्याचा आरोपही नितीन पाटील यांनी केला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांवर कोरोना रुग्ण वाहून नेण्याची जबाबदारी बेस्ट टाकत असेल तर त्यांच्या दैनंदिन गरजेपासून ते त्यांच्या शारीरिक स्वच्छतेपर्यंत, त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यापासून ते कपड्यांपर्यंत सर्व जबाबदारी बेस्ट प्रशासनाने घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बेस्ट बसमधून कोरोना रुग्ण नेताना कर्मचाऱ्याला कुठलीही पूर्व सूचना दिली जात नाही. चालक एकटाच बसमध्ये असल्याने त्याच्या एकट्याच्या जिवावर कोरोना सारख्या गंभीर रुग्णाला सोडणे म्हणजे संपूर्ण मुंबईकर जनतेच्या जिवाशी खेळला जाणारा खेळ आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण हे रुग्णवाहिकेसारख्या बंदिस्त गाडीतूनच वाहून न्यायला हवेत. बस ही संपूर्ण उघडी असते, अशा गाडीतून कोरोना रुग्ण वाहून नेणे म्हणजे कोरोना विषाणू पसरवण्यास मदत करण्यासारखे असल्याचे पाटील म्हणाले.
एखादा माथेफिरू रुग्ण बसच्या मागील दरवाज्यातूनला गाडी ऊभी असताना पळून गेला तर काय होईल?, याचाही विचार बेस्ट प्रशासनाने केलेला नाही. असा प्रकार घडल्यास त्या परिस्थितीला बेस्ट प्रशासन जबाबदार राहील. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना 'कोरोना सुरक्षा कवच' हे पुणे महापालिका आयुक्तांनी देण्याचे जाहीर केले आहे, त्या अत्यावश्यक सेवेत पुणे वाहतूक सेवेचे कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मग सर्वात श्रीमंत पालिका असलेली मुंबई महापालिका बेस्टच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच का देत नाही असा प्रश्न नितीन पाटील यांनी केला.